जोगेश्‍वरीतील ज्वेलर्स व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकी

लवकरच या दागिन्यांचे बिल आणून देऊ, असे सांगून त्याने पगारिया यांच्याकडून पैसे घेतले होते.
जोगेश्‍वरीतील ज्वेलर्स व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकी

मुंबई : जोगेश्‍वरीतील एका ज्वेलर्स व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी लकी ऊर्फ योगेशभाई जगदीशभाई केसुर या आरोपीविरुद्ध जोगेश्‍वरी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. चोरीचे दागिने खरेदी केल्याचा आरोप करून त्यांच्या अटकेसह बदनामीची भीती दाखवून त्याने व्यापाऱ्याकडून दोन वर्षांत २ कोटी ३८ लाख रुपये खंडणी वसूल केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. निलेश सुरेशकुमार पगारिया यांच्या मालकीच्या ज्वेलरीच्या दुकानात फेब्रुवारी २०२० रोजी लकी आपल्या पत्नीचे दागिने विकण्यासाठी आला होता. लवकरच या दागिन्यांचे बिल आणून देऊ, असे सांगून त्याने पगारिया यांच्याकडून पैसे घेतले होते. मात्र काही दिवसांनी हे दागिने चोरीचे आहेत आणि मला पोलिसांनी पकडले आहे, मी तुमचे नाव पोलिसांना सांगेन, अशी धमकी देऊन त्यांनी सुरुवातीला ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर धमकीसत्र कायम ठेवत त्याने पगारिया यांच्याकडून जवळपास सव्वादोन कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे उकळले. अखेर पगारिया यांनी आपल्या मित्रांच्या सल्ल्यावरून पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी लकीविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंदविला आहे.

logo
marathi.freepressjournal.in