अवैध बांधकामांना आळा; थ्रीडी मॅपिंगद्वारे घेणार शोध

आडव्या उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत असून, त्या तुलनेत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे एक आव्हान उभे ठाकले आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून, यात बेकायदा बांधकामे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर जिओस्पेशियल तंत्रज्ञानाचा वापर करून हे थ्रीडी मॅपिंग केले जाणार आहे.
अवैध बांधकामांना आळा; थ्रीडी मॅपिंगद्वारे घेणार शोध

मुंबई : मुंबईत नव्याने मोठ्या प्रमाणात बांधकामे होत असून, अनेक ठिकाणी इमले उभे राहिले आहेत. बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासह कोणत्या परिसरातील बांधकामात बदल याचा थ्रीडी मॅपिंगद्वारे शोध घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, कुठल्या विभागात बांधकामात बदल झाला याचा थ्रीडी मॅपिंगद्वारे शोध घेत त्याचा पुरावा म्हणून वापर करणे शक्य होणार आहे.

आडव्या उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत असून, त्या तुलनेत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे एक आव्हान उभे ठाकले आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून, यात बेकायदा बांधकामे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर जिओस्पेशियल तंत्रज्ञानाचा वापर करून हे थ्रीडी मॅपिंग केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी पालिकेचा गेल्या दोन वर्षांपासून अभ्यास सुरू होता. सन २०२१ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर वरळी परिसराचा सुमारे १० चौरस किमी क्षेत्राचे थ्रीडी मॅपिंग करत नकाशा तयार करून डिजीटल स्वरूपातील ‘प्रतिवरळी’ साकारण्यात आली. त्यास अपेक्षित यश मिळाल्याने या प्रकल्पाचा आता मुंबई शहराच्या नागरी प्रशासनासाठी उपयोग करून घेतला जाणार आहे.

या डिजिटल थ्रीडी तंत्रज्ञान विषयक कामासाठी जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड यांची मदत लाभली आहे. पालिका प्रशासनाने जीआयएस, एसएपी, रोबोट, ड्रोन अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा यापूर्वीच अवलंब केला आहे. त्यात आता थ्रीडी मॅपिंगची भर पडली आहे. आधुनिक काळात फक्त कागदावरचे नकाशे पाहून प्रशासन करणे तुलनेने आत्यंतिक कठीण आहे. डिजिटल तंत्रज्ञान आणि त्याच्या आधुनिक साधनांचा उपयोग करून बनविलेले नकाशे हे प्रशासन करताना कामकाजाचा दृष्टिकोन आमूलाग्रपणे बदलून टाकतात, अशी माहिती पालिकेच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

प्रत्येक सेंटीमीटरचे अचूक मोजमाप

लाइट डिटेक्शन ॲण्ड रेंजिंग सर्व्हे म्हणजेच लिडार तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वरळीचा तंतोतंत असा थ्रीडी नकाशा तयार करण्यात आला आहे. यामध्ये लहान आकाराच्या व वजनाने हलक्या विमानांच्या सहाय्याने हवाई चित्रीकरण, ड्रोनसारख्या उडणाऱ्या साधनांच्या सहाय्याने मोजमाप व चित्रीकरण (हाय रिझोल्यूशन पेलोड), जमिनीवर धावणाऱ्या वाहनांवर आधुनिक साधने लावून मोजमाप व चित्रीकरण (मोबाईल स्ट्रीट इमेजरी) करण्यात आले आहे. तसेच संवेदक (सेन्सर्स) देखील यामध्ये समाविष्ट असतात. त्यामुळे प्रत्यक्ष भूभागाचे, परिसरातील प्रत्येक सेंटीमीटरचे अत्यंत अचूक असे मोजमाप होते. हे सर्व कामकाज एकत्रित करून डिजिटल अंतिम स्वरूप दिले जाते.

सेवा-सुविधांच्या मूल्यमापनासाठी उपयोग

थ्रीडी मॅपिंग पद्धतीने फक्त प्रकल्पांची अंमलबजावणीच नव्हे, तर पायाभूत सेवा-सुविधांचे योग्य नियोजन करून त्यांचा दर्जा उंचावणे, सेवा-सुविधांचे मूल्यमापन, आपत्ती व्यवस्थापन, वातावरण बदलांच्या प्रभावाचे विश्लेषण, नागरिकांची सुरक्षितता अशा एक ना अनेक कामामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग होतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in