
गेल्या काही दिवसांत हनुमान चालीसा आणि मशिदींवरील भोंगे या मुद्द्यावरून देशभरात राळ उठवून देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर हा गदारोळ काही शमण्याची शक्यता दिसत नाही. राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आल्याने राजकीय वर्तुळात आणखीनच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन राज ठाकरे यांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. “राज ठाकरे यांच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल,” असा इशारा नांदगावकर यांनी दिला आहे.
गेल्या महिनाभरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरून आवाज उठवला. त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात याची चर्चा आहे. राज ठाकरे यांच्या नावे बाळा नांदगावकर यांना हे पत्र आले आहे. “मला एक धमकीचं पत्र आले आहे. भोंग्याचा विषय समोर आल्यापासून अशा प्रकारच्या धमक्या मिळत आहेत. पत्रात माझ्यासह राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मी, राज ठाकरेंना पत्र दाखवलं आणि काल संध्याकाळी पोलीस आयुक्तांना भेटून या पत्राची प्रत त्यांना दिली आहे. पोलीस काय कारवाई करतात, ते पाहू,” असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.