चर्चगेट-विरारदरम्यान १५ डब्यांची लोकल धावणार

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची संख्या वाढत असून, जादा १५ डबा लोकल फेऱ्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे
चर्चगेट-विरारदरम्यान १५ डब्यांची लोकल धावणार
ANI
Published on

मुंबई : मुंबई महानगरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, गर्दीचा भार रेल्वे वाहतुकीवर पडत आहे. सकाळ आणि सायंकाळच्या वेळी श्वास कोंडणाऱ्या गर्दीतून प्रवाशांना धक्काबुक्की सहन करून प्रवास करावा लागतो. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील लोकलमधील प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी आता चर्चगेट-विरारदरम्यान १५ डब्यांची धीमी लोकल सुरू करण्याचा विचार आहे. चर्चगेट-अंधेरीदरम्यानच्या फलाटांची लांबी वाढवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे लवकरच चर्चगेटवरून थेट विरारपर्यंत १५ डब्यांची धीमी लोकल धावण्यास सज्ज होईल.

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची संख्या वाढत असून, जादा १५ डबा लोकल फेऱ्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. सध्या पश्चिम रेल्वेवरून अंधेरी-विरार धीम्या आणि चर्चगेट-विरार जलद मार्गावरून १५ डब्यांच्या १९९ लोकल फेऱ्या धावतात. फलाटांची लांबी कमी असल्याने चर्चगेट-अंधेरीदरम्यान धीम्या मार्गावर १५ डब्यांची लोकल फेरी होत नाही. त्यामुळे धीम्या मार्गावरील १२ डब्यांच्या लोकल फेऱ्यांवर गर्दीचा भार कायम आहे. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी १५ डबा लोकल वाढवणे आवश्यक आहे. यासाठी चर्चगेटपर्यंत सर्व फलाटांची लांबी वाढवण्याचा विचार आहे. १५ डबा लोकलसाठी आवश्यक पायाभूत सुविधा वाढवण्यात येतील, असे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in