दिलीप कुमार यांच्या बंगल्यावर लक्झरी निवास प्रकल्प, म्युझियम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊनही त्याच्यावर कारवाई झाली नाही
दिलीप कुमार यांच्या बंगल्यावर लक्झरी निवास प्रकल्प, म्युझियम

मुंबई : आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे अभिनेते दिलीप कुमार यांच्या पाली हिल येथील बंगल्याचा लवकर विकास होणार आहे. ठाण्यातील नामवंत बिल्डर आशर ग्रुपतर्फे या प्रकल्पाचे काम होणार आहे. या प्रकल्पात लक्झरी निवासस्थान, म्युझियम आकारण्यात येणार आहे.

या जागेचे रुपांतर अतिआलिशान निवासी जागेत रूपांतरित करण्याचे काम आशर समूह करणार आहे. त्यासोबतच जुन्या काळातील सुपरस्टारला समर्पित संग्रहालयाच्या रूपात त्यांचा जीवन प्रवास रेखाटण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नावही ‘द लिजंड’ असे ठेवण्यात येईल, असे कळते. हा प्रकल्प १६०० मीटर चौरसच्या भूखंडावर साकारला जाणार आहे.

आशर समूहाकडून वांद्रे पाली परिसरातील हा दुसरा मोठा प्रकल्प आहे. हे दोन्ही प्रकल्प अतिअलिशान श्रेणीतील आहेत. या प्रकल्पात प्रति चौरस फूटाचा दर १.३५ लाख रुपये आहे.

या बंगल्यात दिलीप कुमार यांचे १९५३ ते २००३ पर्यंत वास्तव्य होते. हा बंगला मोडकळीत झाल्यानंतर ते पत्नी सायराबानू यांच्यासोबत दुसरीकडे राहायला गेले.

त्यानंतर या भूखंडाबाबत विकासाच्या हक्काबाबत अनेक वावड्या उठत होत्या. याबाबत सायराबानू यांनी बिल्डर समीर भोजवानी यांना २५० कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस बजावली होती. सायराबानू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हे प्रकरण नेले होते.

२०१८ मध्ये त्यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे बंगला बळकवण्याप्रकरणी तक्रार नोंदवली होती. या मालमत्तेचे मालकी हक्क हस्तांतरित करण्यासाठी भोजवानीने बनावट कागदपत्रे बनवली होती.

डिसेंबर २०१८ मध्ये सायरा बानू यांनी आपल्या ट्विटद्वारे सांगितले की, भूमाफीया समीर भोजवानी हा तुरुंगातून सुटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊनही त्याच्यावर कारवाई झाली नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in