
बोगस कागदपत्रे तयार करून भारतीय पासपोर्टच्या आधारे विदेशात जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांचा मुंबई पोलिसांसह एटीएसने शोध सुरू केला आहे. या दोघांचा घातपाती कारवायांमध्ये सहभाग असावा, असा पोलिसांचा संशय आहे.
गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एफआयसी डेस्कला एक मेल आला होता. त्यात दोन बांगलादेशी नागरिक मुंबई शहरात वास्तव्यास असून या दोघांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे समीर रॉय आणि सुजन सरकार नावाने दोन भारतीय पासपोर्ट मिळविले आहेत. ते दोघेही बांगलादेशातील अतिरेकी संघटनेशी संबंधित असून त्यांच्या मुंबईतील हालचाली संशयास्पद आहेत, असे नमूद करण्यात आले होते.
या मेलच्या माहितीनंतर मुंबई पोलिसांसह एटीएसला ही माहिती देण्यात आली होती. या माहितीनंतर पोलिसांनी संबंधित दोन्ही संशयित बांगलादेशी नागरिकांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. याचदरम्यान १८ जुलैला सर्बियाला जाण्यासाठी दोन तरुण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. मात्र, त्यांच्याकडे विदेशात जाण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नव्हती. त्यामुळे त्यांना विदेशात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यानंतर ते दोघेही तेथून निघून गेले होते. आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्बियाला जाण्यासाठी आलेले ते दोन्ही तरुण बांगलादेशी अतिरेकी असल्याचा आता पोलिसांना संशय आहे. ते अद्याप मुंबई शहरात वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांचा आता पोलिसांकडून शोध सुरू आहे. मेल पाठविणाऱ्या व्यक्तीने या दोघांना अटक करून त्यांची चौकशी करावी. या दोघांच्या चौकशीतून खुलासे होऊ शकतात.