
मुंबई : जुलै महिन्यांत वांद्रे रेल्वे टर्मिनस स्थानकात एका अल्पवयीन मुलाला एका जमावाकडून अमानुषपणे झालेल्या मारहाणप्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध १४१, १४२, १४३, १४६, १४७, १४९, ३२३ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लव्ह जिहादच्या संशयावरून हा प्रकार घडल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
दरम्यान, या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश रेल्वे पोलिसांना दिले आहेत. अंबरनाथ येथे राहणारी एक अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेली होती. तिच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे तिच्या पालकांनी तिच्या मिसिंगची तक्रार अंबरनाथ पोलीस ठाण्यात केली होती. या मुलीचा शोध सुरू असतानाच, ही मुलगी एका अल्पवयीन मुलासोबत वांद्रे रेल्वे टर्मिनस येथे आल्याची माहिती काही लोकांना मिळाली होती. या मुलासोबत ती मुलगी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे जाणार होती.
लव्ह जिहादचा हा प्रकार असल्याचे समजून या जमावाने या तरुणाला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचा एक व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा संपूर्ण प्रकार वांद्रे रेल्वे टर्मिनस स्थानकात घडल्याने त्याची रेल्वे पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली होती. निर्मलनगर पोलिसांकडून प्राप्त माहितीनंतर रेल्वे पोलिसांनी मारहाण करणाऱ्या जमावाविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून आक्षेपार्ह घोषणा दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, या व्हिडिओवरून मारहाण करणाऱ्या आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू असून लवकरच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.