
मुंबई महानगरातील रस्त्यांवर सततच्या पावसामुळे तयार होणारे खड्डे बुजवले तरी पाऊस आणि वाहतुकीचा ताण यामुळे ते पुन्हा खड्डे होतात. खड्डे भरण्याच्या सध्याच्या तंत्रज्ञानाच्या मर्यादा लक्षात घेता, खड्डे बुजवण्यासाठी नवीन अभियांत्रिकी पद्धतींची चाचपणी करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिले आहेत. दरम्यान, वरिष्ठ अधिकारी म्हणजे वातानुकूलित कार्यालयात बसून आदेश देणारा हा समज मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी रविवारी मोडून काढला आहे.
मागील काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे प्रामुख्याने डांबरी रस्त्यांवर खड्डे पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. हे खड्डे तत्काळ बुजवण्याची कार्यवाही केली जात असली तरी, सतत पडणाऱ्या पाऊस व वाहतुकीचा ताण यामुळे पुन्हा खड्डे होतात. या पार्श्वभूमीवर अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी वेलरासू यांनी रविवारी पश्चिम उपनगरातील विविध ठिकाणी भेटी देऊन खड्डे बुजविण्याच्या कामांची पाहणी केली.
पश्चिम उपनगरात १२ ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत पावसाळ्यात रस्त्यांवर उद्भवणारे खड्डे भरण्यासाठी प्रामुख्याने विभाग कार्यालयांच्या स्तरावर कार्यवाही केली जात आहे. कोल्ड मिक्स सारखे तंत्रज्ञान वापरून खड्डे भरण्यात आले तरी जोरदार पाऊस आणि वाहतुकीच्या ताणामुळे खड्ड्यांचा टिकाव लागत नाही. खड्डे पुन्हा तयार होवून खडी व इतर कण रस्त्यावर पसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे त्यावर देखरेख करण्याचा अतिरिक्त ताण देखील महानगरपालिकेच्या यंत्रणेवर येत आहे. अशा स्थितीत सर्वसामान्य नागरिकांची व वाहन चालकांची गैरसोय होऊ नये आणि खड्ड्यांच्या समस्येपासून मुक्तता मिळावी म्हणून लवकरात लवकर नवीन अभियांत्रिकी पद्धतींची चाचणी करणे आवश्यक आहे, असे वेलरासू म्हणाले.