‘मेट्रो-३’ला नवा मुहूर्त! पहिला टप्पा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सेवेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार

कुलाबा-वांद्रे-सीप्झ दरम्यानची मुंबईतील पहिल्या भूमिगत ‘मेट्रो-३’चा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
‘मेट्रो-३’ला नवा मुहूर्त! पहिला टप्पा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सेवेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार
Published on

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ दरम्यानची मुंबईतील पहिल्या भूमिगत ‘मेट्रो-३’चा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मेट्रो-३’च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भूमिगत मेट्रो प्रकल्पाची आरे ते बीकेसी ही पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ प्रयत्नशील आहे. पहिल्या टप्प्यातील ‘आरडीएसओ’च्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. तसेच अग्निशमन दलाने सर्व मेट्रो स्थानकांची सुरक्षा पाहणी केली आहे. तसेच मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांमार्फत सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

त्यानुसार पंतप्रधान कार्यालयाने ‘एमएमआरसी’ला ऑक्टोबर महिन्यातील तीन तारखा दिल्या आहेत. त्यानुसार ४, ५ किंवा ६ ऑक्टोबर रोजी ‘मेट्रो-३’चे लोकार्पण करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकरांची ‘मेट्रो-३’ची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

‘एमएमआरसीएल’च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या की, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीएमआरएस) वैधानिक परीक्षणाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच मेट्रो गाड्यांच्या तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर आम्ही या मार्गिकेचा पहिला टप्पा सुरू करू शकतो. ‘मेट्रो-३’ प्रकल्प ३३.५ किमीचा आहे. कुलाबा ते सीप्झ ही मार्गिका आहे. या मार्गिकेवर २७ स्टेशन्स आहेत. मेट्रो प्रकल्पासाठी आरडीएसओ, स्वतंत्र सुरक्षा संस्था, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त आदींची परवानगी लागते. ‘एमएमआरसीएल’च्या ताफ्यात सध्या १९ मेट्रो रेल्वेगाड्यांचा ताफा आहे. पहिला टप्पा सुरू करण्यासाठी तो पुरेसा आहे. रोज २६० फेऱ्या चालवून त्यातून १७ लाख प्रवासी प्रवास करू शकतात.

logo
marathi.freepressjournal.in