चांद्रयान-३च्या रॉकेटचा एक भाग नियंत्रणाबाहेर वातावरणात केला प्रवेश : इस्रोची माहिती

या निष्क्रिय करण्याच्या प्रक्रियेत प्रॉपेलेंट व ऊर्जास्रोतांना हटवले होते. त्यामुळे अंतराळातील स्फोटाच्या धोक्याला कमी करता येऊ शकेल
चांद्रयान-३च्या रॉकेटचा एक भाग नियंत्रणाबाहेर वातावरणात केला प्रवेश : इस्रोची माहिती

श्रीहरिकोटा : चांद्रयान-३ ला अंतराळात सोडणाऱ्या ‘एलव्हीएम३ एम४’ या रॉकेटचा एक भाग नियंत्रणाबाहेर गेला आहे. हा भाग पुन्हा वातावरणात आला आहे, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) दिली.

अनियंत्रित झालेला हा भाग रॉकेटच्या क्रायोजेनिकवरील वरचा होता. त्याने ‘चांद्रयान-३’ला १४ जुलैला निर्धारित कक्षेत स्थापित केले. हा भाग १५ नोव्हेंबर रोजी दुपारी २.४२ वाजता पृथ्वीच्या वातावरणात दाखल झाला. हा भाग अनियंत्रित का झाला, याचे कारण समजू शकले नाही. हा भाग प्रशांत महासागरात कोसळण्याची शक्यता आहे, असे इस्रोने सांगितले.

‘चांद्रयान-३’ लॉन्च केल्यानंतर १२४ दिवसांनी ‘एनओआरएडी आयडी ५७३२१’ या नावाच्या या रॉकेटचा भाग पृथ्वीच्या कक्षेत पुन्हा आला. ‘चांद्रयान-३’ला कक्षेत स्थापन केल्यानंतर रॉकेटचा हा भाग निष्क्रिय करण्याच्या प्रक्रियेतूनही गेला होता.

या निष्क्रिय करण्याच्या प्रक्रियेत प्रॉपेलेंट व ऊर्जास्रोतांना हटवले होते. त्यामुळे अंतराळातील स्फोटाच्या धोक्याला कमी करता येऊ शकेल. ही प्रक्रिया आंतरएजन्सी अंतराळ कचरा समन्वय एजन्सी व संयुक्त राष्ट्रांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार होत असते.

‘चांद्रयान-३’ लॉन्च झाल्याच्या ४१ व्या दिवशी २३ ऑगस्टला चंद्रावर लँडिंग केले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिलाच देश बनला.

logo
marathi.freepressjournal.in