मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन; आरोपीस पाच तासांत अटक

आरोपीविरोधात खोटी माहिती देणे, समाजात भीती पसरवणे आदी कलमांतर्गत वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन; आरोपीस पाच तासांत अटक

पोलीस नियंत्रण कक्षाला हॉटेल ग्रॅण्ड हयातमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचा दूरध्वनी आला होता. या घटनेनंतर सर्वच यंत्रणा गुरूवारी सतर्क झाल्या. मात्र हॉटेलची तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. अखेर याप्रकरणी सांताक्रुझ येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. दारूच्या नशेत आरोपीने कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलीस नियंत्रण कक्षाला गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे सर्व यंत्रणाची पाहणी केली. त्यात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. अखेर दूरध्वनी करणाऱ्या आरोपीचा शोध घेत त्याला शुक्रवारी पहाटे अटक करण्यात आली आहे.

सूरज जाधव(३४) असे अटक आरोपीचे नाव असून तो सांताक्रुझमधील कलिना येथील रहिवासी आहे. चौकशीत आरोपीने दारूच्या नशेत कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीविरोधात खोटी माहिती देणे, समाजात भीती पसरवणे आदी कलमांतर्गत वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तंत्रज्ञानाच्या मदतीने पाच तासांच्या आत आरोपीची माहिती घेऊन त्याला अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबईत इन्फिनिटी मॉल अंधेरी, पीव्हीआर मॉल जुहू आणि सहारा हॉटेल विमानतळावर या तीन ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याची खोटी माहिती देणारा दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने आपण गोवा सीबीआयमधून आर्यन सिंघानिया बोलत असल्याची ओळख सांगितली होते. त्याप्रकरणीही आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो नवी मुंबईतील तुर्भे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in