
मुंबई : मुलाच्या नोकरीसाठी एका पोलीस हवालदारालाच पाच लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या प्रसाद बापूसाहेब कांबळे या ३८ वर्षांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गावदेवी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
काळाचौकी येथील नवीन पोलीस वसाहतीत राहणारे तानाजी शंकर मोहिते हे पायधुनी ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून काम करतात. सहा वर्षांपूर्वी त्यांची ग्रँटरोड येथे प्रसाद कांबळेशी ओळख झाली होती. प्रसाद हा तेथील यादगार गेस्ट हाऊसमध्ये नियमित येत होता. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. काही महिन्यांपूर्वी त्याने आपली भारतीय रेल्वेत चांगली ओळख असून त्याच्या मुलाला रेल्वेमध्ये ज्युनिअर इंजिनिअर पदावर नोकरी मिळवनू देण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्यावर विश्वास ठेवनू त्याने मुलाच्या नोकरीसाठी त्याला विनंती केली. इतकेच नव्हे तर नोकरीसाठी त्याला पाच लाख रुपये दिले होते. ही रक्कम दिल्यानंतर त्याने त्यांच्या मुलाचा अर्जासह इतर सर्व कागदपत्रे दिल्लीतील रेल्वे मंत्रालयात पाठविल्याचे सांगितले. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्याला नोकरी मिळवून दिली नाही. वारंवार विचारणा करूनही तो त्यांना विविध कारणे सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता.
गेस्ट हाऊसमध्ये विचारणा केल्यानंतर प्रसाद काही महिन्यांपासून येत नसल्याचे उघडकीस आले. हा प्रकार लक्षात येताच तानाजी मोहिते यांनी गावदेवी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रसाद कांबळेविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांत पळून गेलेल्या प्रसादला शनिवारी पोलिसांनी अटक केली. त्याने कोल्हापूर, बेळगाव आणि मुंबईतील अनेकांना नोकरीच्या नावाने लाखो रुपयांना गंडा घातल्याचे चौकशीतून उघडकीस आले आहे.