दोन बेस्ट बससह खासगी गाडीला पोलीस व्हॅनची धडक

व्हॅन चालक जखमी; वाशी एपीएमसी मार्केट जवळील घटना
दोन बेस्ट बससह खासगी गाडीला पोलीस व्हॅनची धडक

मुंबई : वाशी एपीएमपी मार्केट जवळ शुक्रवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास पोलीस व्हॅनने दोन बेस्ट बसेस व एका खासगी गाडीला धडक दिली. या घटनेत पोलीस व्हॅन चालक जखमी झाले असून, खासगी गाडी व बेस्टचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या संपूर्ण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

शुक्रवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास कुर्ला आगाराची (६६२७) क्रमांकाची ५१७ मर्यादित वरील बस सांताक्रूझ बस स्थानक (पूर्व) ते एपीएमसी वाशी सेक्टर २६ कडे जात होती. ही बस वाशी येथील आयसीएल सिग्नल (अरेंजा सिग्नल ) येथे आली असता, घणसोली कडून येणारी पोलीस व्हॅन (एम एच-४३- एक्यू -६७८६) ने या बसच्या डाव्या बाजूला धडक दिली. त्यानंतर या पोलीस व्हॅनने एका खासगी कारला धडक दिली आणि त्यानांतर या व्हॅनने पुन्हा विरुद्ध दिशेने येणाऱ्या व नेरुळ बस स्थानक ते महाराणा प्रताप चौक मुलुंड दरम्यान धावणाऱ्या ५१२ मर्यादित क्रमांकाच्या बसला धडक दिली. या धडकेत दोन्ही बस गाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या धडकेत पोलीस व्हॅन चालक जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in