व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत घट; घरगुती सिलिंडरच्या दरात बदल नाही

सोमवारपासून राजधानी दिल्लीत १९ किलोच्या सिलिंडरची किंमत १९७६ रुपये होणार आहे.
व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत घट; घरगुती सिलिंडरच्या दरात बदल नाही

एलपीजी गॅसच्या किमती गगनाला भिडलेल्या असतानाच आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅसवितरक कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. सोमवारपासून एलपीजी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ३६ रुपयांची घट करण्यात आली आहे; मात्र आज घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सोमवारपासून राजधानी दिल्लीत १९ किलोच्या सिलिंडरची किंमत १९७६ रुपये होणार आहे. सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून नवे दर लागू झाले आहेत. याआधी एका व्यावसायिक सिलिंडरसाठी २०१२ रुपये मोजावे लागत होते. ६ जुलै २०२२ रोजी एलपीजी गॅसच्या किमतीत नऊ रुपयांची घट झाली होती. तर १ जुलै २०२२ रोजी व्यावसायिक सिलिंडर १९८ रुपयांनी स्वस्त झाला होता. गेल्या तीन महिन्यांत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत केलेली ही चौथी कपात आहे. जूनपासून व्यावसायिक सिलिंडर सुमारे ३७८ रुपयांनी स्वस्त झाला आहे. कोलकाता, मुंबई, चेन्नई येथे सध्या अनुक्रमे २०९५.५०, १९३६.५० आणि २१४१ रुपये इतका दर आहे.गेल्या महिन्यात घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला होता. देशात १४.२ किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमती कायम आहेत. एकीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या असल्या तरी घरगुती गॅस सिलिंडरच्या बाबतीत जनतेला कोणताही दिलासा मिळालेला नाही.

दरम्यान, सोमवारी देशात विमान इंधन म्हणजेच एटीएफच्या (एव्हिएशन टर्बाइन फ्युएल) किमतीत १२ टक्क्यांनी कपात करण्यात अली. एटीएफमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कपात आहे. एटीएफमध्ये दर कपात केल्याने आता हवाई प्रवास स्वस्त होण्याची अपेक्षा आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in