मुंबई : उसने पैसे दिले नाहीत म्हणून कबीर ऊर्फ पापा करीमउल्ला इद्रिसी या २४ वर्षांच्या रिक्षाचालकाचे अपहरण करून त्याची रिक्षात गळा आवळून हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात उघडकीस आला आहे. हत्येनंतर मारेकऱ्यांनी त्याचा मृतदेह कामोठे खाडीलगतच नाल्यात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध कट रचून अपहरण करून हत्या करणे आणि हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. नफिस ऊर्फ कक्की शराफत खान, मोहम्मद साकिर मोहम्मद शकील शेख ऊर्फ जॅस्टीन, इम्रान अहमद ऊर्फ इम्मो शब्बीर अहमद खान आणि आतिक आरिफ मेमन अशी या चौघांची नावे आहेत. विशेष म्हणजे एका हत्येच्या गुन्ह्यांत पोलीस कोठडीत असताना आरोपींनी दुसऱ्या हत्येच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. कबीर इद्रीसी हा गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात राहत होता. त्याचा नफीस ऊर्फ अक्क्की हा मित्र असून तो त्याचीच रिक्षा भाड्याने चालवत होता. त्याने नफीसकडून ७० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जानंतर तो त्याला दरमाह दिड हजार रुपये देत होता; मात्र नंतर त्याला पेसे देता आले नाही. उसने घेतलेले पैसे कबीर देत नव्हता. त्यात तो पळून गेला होता. त्यामुळे त्याचा नफीसकडून शोध सुरू होता. ही शोधमोहीम सुरू असताना त्याच्यासह त्याच्या तीन सहकार्याला त्याला धारावी येथून ताब्यात घेतले होते. दोन दिवस रिक्षातून विविध ठिकाणी नेऊन त्यांनी ६ जानेवारी रोजी कबीरची रिक्षात गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह शीव-पनवेल रोडवरील कामोठे खाडीलगतच्या एका नाल्यात फेकून हत्येचा पुरावा नष्ट करून पळून गेले होते.