क्लायमेट चेंजसाठी स्वतंत्र विभाग; पालिकेच्या प्रत्येक वॉर्डात उपमुख्य अभियंता

पर्यावरण संवर्धनासाठी २००५ मध्ये पालिकेत उपायुक्त पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग तयार करण्यात आले
क्लायमेट चेंजसाठी स्वतंत्र विभाग; पालिकेच्या प्रत्येक वॉर्डात उपमुख्य अभियंता

मुंबई : ‘पर्यावरण विभागाची एकाच अधिकाऱ्यावर भिस्त’ अशी बातमी दैनिक 'नवशक्ति'ने २ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाने तातडीने दखल घेत पर्यावरण व क्लायमेट चेंज असे स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रत्येक वॉर्डात उपमुख्य अभियंताची नियुक्ती करण्यात येणार आहे. पर्यावरण विभागाच्या या प्रस्तावाला उपायुक्तांची मंजुरी मिळाली असून, आयुक्तांच्या मंजुरीनंतर तातडीने विभाग सुरू करण्यात येणार आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी २००५ मध्ये पालिकेत उपायुक्त पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग तयार करण्यात आले; मात्र २०१६ पर्यंत पर्यावरण विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग एकाच उपायुक्ताच्या माध्यमातून काम करीत होते. परंतु २०१६ मध्ये या विभागाचे विभाजन झाल्यानंतर स्वतंत्र उपायुक्त नेमण्यात आले; मात्र दोन्ही विभागांच्या अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी पर्यावरण विभागाला एकही कर्मचारी देण्यात आला नाही, तर सुमारे ४० हजार कर्मचारी घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्तांच्या अखत्यारित समाविष्ट करण्यात आले. यातच गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत प्रदूषण वाढल्याने हवेची गुणवत्ता प्रचंड खालावत असल्याने उपाययोजना करण्यासाठी पालिकेची धावपळ उडत आहे; मात्र पर्यावरण विभागाकडे कर्मचारीच नसल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे अनेक वेळा घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि इतर कर्मचाऱ्यांची तात्पुरती मदत पर्यावरण विभागाला घ्यावी लागत आहे. त्यामुळे पर्यावणासाठी तयार होणारा स्वतंत्र विभाग फायदेशीर ठरणार आहे.

कारवाईचे अधिकार देणार

प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेने २५ ऑक्टोबर रोजी २७ प्रकारची नियमावली जाहीर करून मुंबईत सर्व सहा हजारांवर बांधकामांना त्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक केले आहे. यानुसार विभागवार तपासणी करून कारवाई सुरू आहे, तर नव्याने स्थापन होणाऱ्या विभागाच्या माध्यमातून प्रत्येक विभागाच्या माध्यमातून चालणाऱ्या कामांमध्ये पर्यावरण रक्षणासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात येईल. यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात येईल. शिवाय नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणे, नोटीस बजावणे आणि दंड वसूल करण्याचे अधिकार देण्यात येणार आहेत. यासाठी ‘बायलॉज’मध्ये आवश्यक बदल करण्यात येतील.

‘अशी’ होणार नव्या विभागाची रचना

पर्यावरण विभागाचा एक चिफ इंजिनिअर

दोन डेप्युटी चिफ इंजिनिअर

तीन एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर

सातही झोनसाठी असिस्टंट इंजिनिअर

समन्वयासाठी वॉर्डमध्ये सब इंजिनिअर

अधिकाऱ्यांतर्गत आवश्यक कर्मचारी

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in