अंधेरीतील स्पामध्ये मसाजच्या नावाने सेक्स रॅकेट

पोलिसांनी तिथे बोगस ग्राहक पाठवून त्याची शहानिशा करण्याचे ठरविले होते
अंधेरीतील स्पामध्ये मसाजच्या नावाने सेक्स रॅकेट

मुंबई : अंधेरीतील एका स्पामध्ये गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी विभागाने कारवाई करून स्पाचा मॅनेजर चंद्रकांत अर्जुन निकम याला अटक केली तर नऊ तरुणीसह महिलांची सुटका केली. मसाजच्या नावाने या स्पामध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी भादवीसह पिटा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यांत स्पाचा मालकाला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून, त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

अंधेरीतील वर्सोवा, एसव्हीपी नगर, म्हाडा परिसरात बंगलो क्रमांक ६४ मध्ये रिवायहल वेलनेस नावाचे एक स्पा आहे. या स्पामध्ये काम करणार्‍या तरुणीसह महिलांना मॅनेजर जास्त पैशांचे आमिष दाखवून ग्राहकांसोबत वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करत असल्याची माहिती अंमलबजावणी विभागाला मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी तिथे बोगस ग्राहक पाठवून त्याची शहानिशा करण्याचे ठरविले होते. सायंकाळी हा बोगस ग्राहक तिथे गेला असता त्याला स्पाच्या नावाने सेक्स रॅकेट चालत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांना ही माहिती दिली होती.

या माहितीनंतर या अधिकार्‍यांनी तिथे छापा टाकून तिथे सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी स्पाचा मॅनेजर असलेला चंद्रकांत निकमला चौकशीसाठी ताब्यात घेतले. घटनास्थळी पोलिसांना नऊ तरुणीसह महिला सापडल्या. त्यांच्या चौकशीत तिथे मसाजच्या नावाने सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर चंद्रकांत निकमला पोलिसांनी अटक केली.

logo
marathi.freepressjournal.in