मुंबईच्या स्वच्छतेकडे कंत्राटदारांची पाठ; निविदा प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ

मुंबईच्या स्वच्छतेकडे कंत्राटदारांची पाठ; निविदा प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ

मुंबई : स्वच्छ व सुंदर मुंबईच्या स्वच्छतेसाठी एकाच कंत्राटदाराची निवड करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेने १५ फेब्रुवारी रोजी जागतिक स्तरावर निविदा प्रक्रिया राबवली. मात्र निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने तिसऱ्यांदा निविदा प्रक्रियेला सोमवार ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. १५०० कोटींच्या निविदा मागवल्यानंतरही मुंबईच्या स्वच्छतेकडे कंत्राटदारांनी पाठ फिरवली आहे.

दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात ६० टक्के मुंबईकर झोपडपट्टीत वास्तव्य करतात. आडव्या उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत असून झोपडपट्टीच्या स्वच्छतेकडे काहीसे दुर्लक्ष झाले. त्यामुळे झोपडपट्टी कचरामुक्तीसाठी स्वतंत्र धोरण राबवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

पालिकेच्या धोरणानुसार विशेषत: झोपडपट्टीतील कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि डम्पिंग ग्राऊंडपर्यंत कचरा पोहोचवण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर सोपवण्यात येणार आहे. यासाठी १५ फेब्रुवारी रोजी निविदा मागवण्यात आल्या. परंतु निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने ११ मार्च रोजी एक आठवड्याची मुदतवाढ दिली. मात्र त्यावेळीही प्रतिसाद न मिळाल्याने १८ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र यावेळी कोणीच कंत्राटदार पुढे न आल्याने २५ मार्चपर्यंत पुन्हा एकदा मुदतवाढ दिली. मात्र तिसऱ्यांदा निविदा प्रक्रियेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

स्वतंत्र धोरणांतर्गत कंत्राटदारांची जबाबदारी!

  • झोपडपट्टी भागातील कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि डंपिंग ग्राऊंडपर्यंत कचरा पोहोचवण्याची जबाबदारी सोपवण्यात येईल.

  • झोपडपट्टी वस्तीमधील गल्ल्यांची सफाई, छोट्या गटारांची सफाईसाठीदेखील स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात येईल.

  • झोपडपट्ट्यांमधील स्वच्छतागृहांच्या सफाईची जबाबदारी स्वतंत्र कंत्राटदारावर असेल. दिवसातून दोन ते तीन वेळा या स्वच्छतागृहांची स्वच्छता करावी लागेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in