बेस्ट पाठोपाठ उपनगरीय रेल्वे स्थानकातही एकाच तिकिटावर करता येणार प्रवास

पुढील वर्षापासून ‘एकात्मिक तिकीट प्रणाली’ची अंमलबजावणी होणार असून रेल्वे, मेट्रो मोनो, बेस्ट आदींमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना एकाच तिकीटाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
बेस्ट पाठोपाठ उपनगरीय रेल्वे स्थानकातही एकाच तिकिटावर करता येणार प्रवास
ANI

बेस्ट उपक्रमाने अलिकडेच एकात्मिक तिकीट प्रणालीची अंमलबजावणी केली असून यासाठी प्रवाशांना कार्डही वाटप करण्यात आले. परंतु रेल्वे, मेट्रोत किंवा अन्य परिवहन सेवांमध्ये ही यंत्रणा उपलब्ध नसल्याने बेस्टच्या या सेवेला अल्प प्रतिसाद मिळत आहे. अशातच उपनगरीय रेल्वे स्थानकातही लवकरच एकाच तिकिटावर प्रवास करता येणे शक्य होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुढील वर्षापासून ‘एकात्मिक तिकीट प्रणाली’ची अंमलबजावणी होणार असून रेल्वे, मेट्रो मोनो, बेस्ट आदींमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना एकाच तिकीटाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. एमआरव्हीसीने यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली असून त्यांचा अहवाल दोन महिन्यात सादर होणार आहे. त्यानंतर निविदा प्रक्रियेसाठी साधारण तीन-चार महिने लागतील. दरम्यान, निविदा प्रक्रेयेअंती कंपनीला या कामाची जबाबदारी दिल्यानंतर टप्प्याटप्प्याने या प्रणालीची अंमलबजावणी होणार असल्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

रेल्वे, मेट्रो, मोनो, बेस्ट व इतर सार्वजनिक परिवहन उपक्रमांसाठी एकच तिकीट असावे यासाठी ‘एकात्मिक तिकीट प्रणाली’ची योजना आखण्यात आली होती. प्रवासाचा वेळ, खर्च वाचावा तसेच लवकरात लवकर इच्छित स्थळी पोहोचण्याचे मार्ग, स्थानकांमधून बाहेर पडल्यास दळणवळणाचे पर्याय उपलब्ध व्हावेत यासाठी ‘एकात्मिक तिकीट प्रणाली’ प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणारी आहे. काही महिन्यांपूर्वीच बेस्ट उपक्रमाने ही सुविधा अंमलात आणत कार्ड वाटप देखील केले.

कशी असणार सुविधा?

या योजनेनुसार रेल्वे स्थानकातील सर्व प्रवेशद्वारांवर कार्ड रीडर बसविण्यात येणार आहेत. प्रवास करणाऱ्यांना कार्ड रीडरवर कार्ड टॅप करावे लागेल, केलेल्या प्रवासानुसार कार्डमधून पैसे वजा होतील आणि तिकीट तयार उपलब्ध होईल. तिकिटाची तपासणी करण्यासाठी तिकीट तपासनीसांना उपकरणे देण्यात येतील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in