मूक आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; मुंबई, ठाणे, पुण्यात ठिकठिकाणी काळ्या फिती लावून महायुती सरकारचा निषेध

बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व शिवसेना (उबाठा) यांच्यातर्फे शनिवारी मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यात ठिकठिकाणी काळ्या फिती लावून राज्यातील महायुती सरकारचाही निषेध करण्यात आला.
मूक आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; मुंबई, ठाणे, पुण्यात ठिकठिकाणी काळ्या फिती लावून महायुती सरकारचा निषेध
Photo Credit: राजेश वराडकर
Published on

मुंबई/पुणे/ठाणे/नागपूर : बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व शिवसेना (उबाठा) यांच्यातर्फे शनिवारी मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यात ठिकठिकाणी काळ्या फिती लावून राज्यातील महायुती सरकारचाही निषेध करण्यात आला. मुंबईत उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी पुण्यात, तर बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाण्यात आंदोलन केले. मविआने संपूर्ण राज्यात केलेल्या या मूक आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

बदलापूरला चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीने शनिवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद घटनाबाह्य ठरवला. त्यानंतर आघाडीने बंद मागे घेत राज्यातील विविध भागांत काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचे ठरवले. शनिवारी सकाळपासूनच मुंबई शहरापासून राज्यातील कानाकोपऱ्यात आंदोलन करत निदर्शने केली.

महिलांवरील अत्याचार रोखण्यात घटनाबाह्य सरकार निष्क्रिय ठरले आहे. राज्यात महिला, मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत असताना कंसमामा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी राख्या बांधून घेण्यात धन्यता मानली. ‘बहीण सुरक्षित, तर घर सुरक्षित’ मात्र महायुतीचे सरकार निर्लज्ज सरकार आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसह महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

उच्च न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवला तरी स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून राज्यात आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा ठाकरे यांनी महायुती सरकारला दिला. दरम्यान, निष्क्रिय महायुती सरकारविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी तोंडाला काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला, तर कंसमामा हाय हाय, शिवसेना झिंदाबाद, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं या घोषणांनी सेना भवन परिसर दणाणून सोडला. यावेळी कट्टर समर्थक निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत आदी उपस्थित होते.

राज्यातील भ्रष्ट, गद्दार, निर्लज्ज सरकार फक्त आपल्याच स्वार्थासाठी झटत आहे. 'लाडकी बहीण' योजना आणली, पण बहिणींच्या सुरक्षेचे काही देणंघेणं नाही. नराधमांविरुद्ध लढण्याऐवजी त्यांची पाठराखण करणारे हे सरकार आहे. राजकीय नेत्यांनाच मुली असं नाही तर प्रत्येकाच्या घरात मुलगी आहे. मुली, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात लढा उभा करण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.

महिलांना संरक्षण देण्यात सरकार अपयशी - नाना पटोले

बदलापूरमध्ये झालेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्या दोन चिमुकल्यांवर १५ दिवसांपासून अत्याचार होत असल्याची माहिती पुढे येत आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये अत्याचाराच्या घटना घडत आहेत. सरकार मुली व महिलांचे रक्षण करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. शासन व प्रशासनाचा वचक नसल्याने अशा घटना वाढत आहेत. याला सर्वस्वी मुख्यमंत्री व गृहमंत्री जबाबदार आहेत. म्हणून दोघांनीही राजीनामे द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

शिंदे, फडणवीस यांच्या जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था नाही - वडेट्टीवार

नागपूरमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी यांनी संविधान चौकात मूक आंदोलन केले. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत २१४१ महिला मुलींवर अत्याचार झाले आहेत. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या जिल्ह्यातच कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही. बदलापूर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला, मा. उच्च न्यायालयाने महायुती सरकारचे थोबाड लाल केले व जनतेने उद्रेक केल्यानंतर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी, यासाठी हे आंदोलन राज्यभर करण्यात येत आहे.

बदलापूरमुळे राज्याच्या लौकिकाला धक्का बसला - शरद पवार

बदलापूरमध्ये घटनेविरोधात पुण्यात शनिवारी महाविकास आघाडीच्या वतीने भरपावसात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘निषेध आंदोलन’ करण्यात आले. तोंडाला काळा मास्क लावून आणि हाताला काळी फीत बांधून शरद पवार यांच्यासह अन्य महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान, “बदलापूरमध्ये बालिकेवर जो अत्याचार झाला, त्यामुळे सबंध देशात महाराष्ट्राच्या नावलौकिकाला प्रचंड धक्का बसला. महिलांच्या रक्षणाची जबाबदारी आजच्या राज्यकर्त्यांवर आहे. पण त्याची जाण राज्यकर्त्यांना राहिलेली नाही, अशी टीका शरद पवार यांनी यावेळी केली.

तोपर्यंत मविआचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत - सुळे

भरपावसात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, बदलापुरातील आंदोलनानंतर सरकारमधील नेते आंदोलन करणारे बाहेरचे होते असे म्हणाले, पण ते कोणत्या का ठिकाणावरून येवोत, ते भारतीय होते आणि ते भारतीय लेकीसाठी तिथे लढत होते. याची नोंद या सरकारने घेतली पाहिजे. मात्र, ती जनता, ते आंदोलक बदलापूरमधील होते हे नंतर समोर आले, ते आपल्या लेकीसाठी लढत होते. यातून सरकार कोणता विचार करते ते लक्षात येते. ही मोठ्या आंदोलनाची सुरुवात आहे. आपणास खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. असं म्हणत सुळे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

logo
marathi.freepressjournal.in