बदलापूरमध्ये खेळाडूंसाठी अद्ययावत मल्टिस्पोर्ट कोर्ट

३ कोटींचा निधी खर्च करून मल्टिस्पोर्ट कोर्ट उभारण्यात आले आहे
बदलापूरमध्ये खेळाडूंसाठी अद्ययावत मल्टिस्पोर्ट कोर्ट
Published on

बदलापूर: कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून बदलापुरात मल्टी स्पोर्टस कोर्ट उभारण्यात आले आहे. याठिकाणी खेळाडूंना अल्पदरात प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. त्यामुळे नवोदित खेळाडूंना याचा चांगला फायदा होणार आहे. विविध क्रीडा प्रकारात नावलौकिक मिळवलेल्या खेळाडूंमुळे खेळाडूंचे माहेरघर अशी बदलापूरची गेल्या अनेक दशकांपासून ओळख आहे. अशा गुणवंत खेळाडूंना सरावासाठी आवश्यक सोयीसुविधांसह हक्काची जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने कुळगाव बदलापूर नगर परिषदेने बदलापूर पूर्वेकडील शिरगाव येथे मल्टीस्पोर्ट कोर्ट उभारले आहे. शिरगाव परिसरातील पडीक मैदानावर हे मल्टीस्पोर्ट कोर्ट उभारण्यात आले आहे. या कोर्टमध्ये स्केटिंग, क्रिकेट, कराटे, बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉलचा सराव करण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर याठिकाणी लाठी काठी, तलवारबाजी यासारख्या थरारक कौशल्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. याठिकाणी क्रिकेटचा सराव करण्यासाठी ३ नेट उभारण्यात आल्या आहेत. तर बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉलसाठी उभारलेल्या नेटला चाकं लावण्यात आली आहेत. या नेट बाजूला करून याठिकाणी खेळाडूंना स्केटिंगचा सराव करता येणार आहे. तसेच याठिकाणी नवीन खेळाडूंना अल्पदरात प्रशिक्षण सुद्धा दिले जाणार आहे. माजी नगरसेविका प्रतिभा गोरे यांच्या संकल्पनेतून हे मल्टिस्पोर्ट कोर्ट उभारण्यात आले आहे. यासाठी त्यांनी नगर परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर ३ कोटींचा निधी खर्च करून मल्टिस्पोर्ट कोर्ट उभारण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in