पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दिशेने पाऊल! अश्विनी भिडे यांची माहिती

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी टप्प्याटप्प्याने काही गोष्टी होत आहेत.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दिशेने पाऊल! अश्विनी भिडे यांची माहिती

वातावरणीय बदलामुळे पर्यावरणाला धोका वाढला असून पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे आहे. हिंदूंचे आराध्य दैवत गणपती बाप्पाचा गणेशोत्सव भविष्यात पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी जनजागृती अभियान, शाडूच्या मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणे, पीओपीच्या गणेशमूर्तींना पर्याय काय, अशा विविध विषयांवर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याशी दैनिक ‘नवशक्ति’ने केलेली खास बातचीत.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन पालिकेच्या वतीने केले जात असले, तरी अंमलबजावणी होताना दिसत नाही?

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी टप्प्याटप्प्याने काही गोष्टी होत आहेत. निर्माल्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाते. गणेशोत्सवाच्या सजावटीत थर्माकोलचा वापर हळूहळू कमी होऊ लागला आहे. त्यामुळे आता पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केली असून पुढील काही वर्षांत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होताना दिसेल.

पीओपीच्या गणेशमूर्तींना पर्याय काय?

पीओपीच्या गणेशमूर्ती पाण्यात लवकर विरघळत नाही. पीओपीच्या गणेशमूर्तीमुळे समुद्रीजीवाला व जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. पीओपीच्या गणेशमूर्तीचा वापर करू नये, अशी सूचना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केल्यानंतर मुंबई महापालिकेच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे गणेशोत्सव साजरा उत्साहात साजरा करता आला नाही. त्यामुळे पीओपीच्या गणेशमूर्तींचा वापर करू नये, हे या वर्षापासून बंधनकारक करणे योग्य नाही. पीओपीच्या गणेशमूर्ती विशिष्ट उंचीच्या बनवल्या जातात; मात्र शाडूच्या मातीच्या मोठ्या मूर्ती बनवण्यात अडचण निर्माण होत असून शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांच्या समस्या दूर कराव्या लागतील; मात्र पुढील वर्षापासून शाडूच्या मातीच्या मूर्तीची संख्या वाढीवर भर देण्यात येईल.

इकोफ्रेंडली गणेशमूर्ती बनवण्यात मूर्तिकारांना जागेची अडचण निर्माण होते, ती अडचणी कशा प्रकारे दूर करणार?

इकोफ्रेंडली गणेशमूर्ती बनवण्यासाठी मुंबई महापालिका जागा उपलब्ध करून देते. तरीही मूर्तिकारांना काय अडचणी हे समजून घेत पुढील गणेशोत्सवापूर्वी जागेसह काही अडचणी असतील, त्या दूर करण्यात येईल.

विसर्जनापूर्वी खड्ड्यांचे विघ्न दूर होणार?

खड्डे बुजवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. बाप्पाची मिरवणूक ज्या मार्गावरून निघते त्या ठिकाणचे खड्डे बुजवण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल व मी स्वतः दिले असून, पुढील दोन दिवसांत खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच १३ धोकादायक पुलांवरून मिरवणूक काढण्याबाबत काय काळजी घ्यावी या सूचना वाहतूक व मुंबई पोलीस करतील.

इको गणेश उत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी दैनिक ‘नवशक्ति’ व ‘फ्री प्रेस जर्नल’ दरवर्षी स्पर्धेच्या माध्यमातून उपक्रम राबवते काय सांगाल?

एखादी चांगली सवय लागावी यासाठी कोणी तरी पुढाकार घेणे गरजेचे आहे. पीओपीच्या गणेशमूर्तींचा वापर टाळा, अशा सूचनांचे पालन होत असेल, तर ही चांगली गोष्ट आहे. अशा प्रकारे बक्षीस देण्याची योजना फ्री-प्रेस जर्नल समूहाकडून राबवण्यात येते, ती प्रोत्साहन देणारी आहे. तसेच या उपक्रमामुळे लोकांमध्ये जनजागृती होते. त्यामुळे दैनिक ‘नवशक्ति’ व ‘फ्री प्रेस जर्नल’ इकोफ्रेंडली गणेश उत्सव’ उपक्रम स्तुत्य उपक्रम आहे.

यंदा विसर्जनासाठी काय उपाययोजना केल्या आहेत

मुंबईत वर्षानुवर्षे गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. १० दिवशी लाडक्या बाप्पाचे विसर्जनासाठी मोठमोठ्या मिरवणुका काढल्या जातात. यंदाचा गणेशोत्सवात कोरोनाचे संकट नसले तरी घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करा, असे आवाहन केले असून यास भक्तांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जी उत्तर विभागात मंगळवारी दुपारी पाहणी केली असता घरगुती गणेशमूर्तींचे ५० टक्के विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. त्यामुळे १०व्या दिवशीच्या विसर्जनावेळी गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करावे, असे आवाहन केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in