पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगठ्याचा घेतला चावा ; वांद्रे पोलीस ठाण्यातील घटना; ५० वर्षांच्या आरोपीस अटक

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक
पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगठ्याचा घेतला चावा ; वांद्रे पोलीस ठाण्यातील घटना; ५० वर्षांच्या आरोपीस अटक

पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करून त्यांच्या अंगठ्याचा चावा घेऊन सरकारी कामात अडथळा आणल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री उशिरा वांद्रे पोलीस ठाण्यात घडला. याप्रकरणी कैलास राजाराम भोकसे या ५० वर्षांच्या मद्यपी आरोपीविरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.

याच गुन्ह्यांत त्याला मंगळवारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. सचिन किसन ढवळे हे सांताक्रुज येथील कोळेकल्याण पोलीस वसाहतीत राहत असून, सध्या वांद्रे पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी त्यांची रात्रपाळी असल्याने ते रात्री आठ वाजता पोलीस ठाण्यात हजर झाले होते. यावेळी त्यांच्यावर ठाणे अंमलदार म्हणून जबाबदारी होती. रात्री अकरा वाजता पोलीस ठाण्यात दत्ताराम उमाजी मोरे हे वयोवृद्ध आले होते. यावेळी त्यांनी कैलास भोकसे याने त्यांना मारहाण केल्याची तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची नोंद करताना तिथे कैलास आला आणि त्याने पोलीस ठाण्यात मोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली होती. त्याने दत्तारामसह इतर दोघांनी त्याला काठीने आणि हाताने मारहाण केल्याचा आरोप केला. त्यानंतर दत्ताराम त्याच्याविरुद्ध खोटी तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात आला आहे असे सांगितले. यावेळी कैलासने मद्यप्राशन केल्याचे दिसून आले. त्यामुळे सचिन ढवळे यांनी त्याला शांत राहण्याचा सल्ला देत वैद्यकीय सल्ल्यासाठी त्याला पाठविले होते. त्याला घेऊन पोलीस शिपाई मोरे हे भाभा रुग्णालयात गेले होते.

यावेळी डॉक्टरांना वैद्यकीय तपासणीस सहकार्य न करता त्याने डॉक्टरांनाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याला पुन्हा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. रात्री एक वाजता त्याने पुन्हा पोलिसांशी हुज्जत घालून पोलीस ठाण्यात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे, तर रागाच्या भरात त्याने सचिन ढवळे यांच्या अंगठ्याचा जोरात चावा घेतला होता. त्यात त्यांना दुखापत झाली होती. या घटनेनंतर त्यांनी कैलासविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी कर्तव्य बजाविणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घालून शिवीगाळ करणे, त्यांच्या अंगठ्याचा चावा घेऊन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in