मुंबईत थाटली बेकायदा मिठाई दुकाने, हॉटेल्स आणि बेकरी ; आरोग्य विभागाच्या सरप्राइज व्हिजीटद्वारे धक्कादायक बाब उघड

पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे
मुंबईत थाटली बेकायदा मिठाई दुकाने, हॉटेल्स आणि बेकरी ; आरोग्य विभागाच्या सरप्राइज व्हिजीटद्वारे धक्कादायक बाब उघड

चमचमीत खाद्यपदार्थ, रसगुल्ले, मिठाई याचा आस्वाद घेण्यासाठी आपसुकच प्रत्येकाचे पाय हॉटेल, मिठाईच्या दुकानाकडे वळतात. मात्र ज्या हॉटेल, मिठाईच्या दुकानात आपण जात आहोत, त्या ठिकाणी आपल्या आरोग्याशी खेळ तर सुरू नाही ना. कारण मुंबईत तब्बल २९१ मिठाईची दुकाने तर, ९१२ हॉटेल चालकांनी बाजार मांडला असून यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

चमचमीत खाद्यपदार्थ, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी मिठाई, खाद्यगृह, हॉटेल्स आहेत. तसेच प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यासाठी नाक्या नाक्यावर सलून, पानपट्टी, बेकरी आहेत. मात्र या अस्थापना सुरू करताना मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणे, स्वच्छता राखणे या गोष्टींचे पालन करणे बंधनकारक आहे. मुंबई महापालिका अधिनियम १९८८ च्या कलम ३९४ अन्वये विशिष्ट अटीवर अनुज्ञापत्रे देऊन नियंत्रण ठेवण्यात येते. तसेच खाद्यगृह हॉटेल मिठाईची दुकाने ही पालिकेच्या आरोग्य विभागाची रितसर परवानगी घेऊन सुरू आहे का याची तपासणी करण्यात येते. जानेवारी ते डिसेंबर २०२२ या वर्षभराच्या कालावधीत विविध अस्थापनांची तपासणी करण्यात आली असता विना परवाना हॉटेल, मिठाईची दुकाने, पिठाची गिरणी सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पालिका अधिनियमानुसार परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येते, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

मायानगरी मुंबई आपल्या पोटात सर्व काही सामावून घेते. मुंबईत आलेला प्रत्येक जण उपाशी पोटी झोपत नाही. त्याप्रमाणे मुंबईत कमावून खाण्याची संधी प्रत्येकाला मिळते. मुंबईचा विकास झपाट्याने होत असून त्याच वेगाने मुंबईत बेकायदा गोष्टींचा बोलबाला आहे. मुंबईत सहा हजारांच्या घरात खाद्यगृह हॉटेल असून यापैकी दीड हजारांहून अधिक खाद्यगृह हॉटेल बेकायदा असल्याचे आरोग्य विभागाच्या सरप्राइज व्हिजीटमध्ये उघड झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असून जीवाशी खेळ सुरू असल्याचे मत मुंबईकर व्यक्त करत आहेत.

अस्थापना परवाना रद्द

पिठाची गिरणी १

सलून ३

खाद्यगृह हॉटेल ११

बेकरी २

मिठाईची दुकाने २

पानपट्टी १

१५८ हॉटेल्सला फायर ब्रिगेडची नोटीस

हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या जीवाची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करणे मुंबईतील हॉटेल-रेस्टॉरंट मालकांना चांगलेच भारी पडले आहे. मुंबई अग्निशमन दलाने मुंबईतील ७८६ विविध हॉटेल रेस्टॉरंटची तपासणी केली असता १५८ हॉटेल्समध्ये अग्नी सुरक्षा यंत्रणा बंद असल्याचे निदर्शनास आले. १५८ हॉटेल, रेस्टॉरंट मालकांना फायर अक्ट नुसार नोटीस बजावण्यात आली असून ६०, ९० व १२० दिवसांत अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित न केल्यास संबंधित हॉटेल रेस्टॉरंटचे वीज व पाणी कनेक्शन कट करण्याचा इशारा मुंबई अग्निशमन दलाने दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in