दहा वर्षांच्या मुलीवर पित्याकडून लैंगिक अत्याचार

पीडित मुलगी १० वर्षांची असून तिच्या आई-वडिलांसोबत कांदिवली परिसरात राहते.
दहा वर्षांच्या मुलीवर पित्याकडून लैंगिक अत्याचार

दहा वर्षांच्या मुलीवर पित्यानेच लैंगिक अत्याचार केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैंगिक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच आरोपी पित्याला कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

पीडित मुलगी १० वर्षांची असून तिच्या आई-वडिलांसोबत कांदिवली परिसरात राहते. तिचे वडील बिगारी कामगार असून त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. अनेकदा पत्नी घरी नसताना तो मुलीसोबत अश्‍लील लैंगिक चाळे करीत होता. तिला कपडे काढण्यास प्रवृत्त करून तिचा विनयभंग करीत होता. काही वेळा त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस, अशी धमकीच त्याने तिला दिली होती. जीवे मारण्याच्या धमकीमुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. अलीकडेच हा प्रकार तिच्या आईला सांगितला होता. ही माहिती ऐकून तिला धक्काच बसला होता. त्यानंतर तिने तिला कांदिवली पोलीस ठाण्यात आणले आणि तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध लैंगिक अत्याचारासह विनयभंग, जीवे मारण्याची धमकी देणे आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.

गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

logo
marathi.freepressjournal.in