हनुमानपाडा येथील एक हजार घरांना धो-धो पाणी; मुलुंड येथील झोपडीधारकांना दिलासा

हनुमानपाडा झोपडपट्टीत पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु कमी दाबाने आणि दूषित पाणी पुरवठा होतो
हनुमानपाडा येथील एक हजार घरांना धो-धो पाणी;
मुलुंड येथील झोपडीधारकांना दिलासा

मुंबई : मुलुंड पूर्व हनुमानपाडा झोपडपट्टीत ३०० मिमी व्यासाच्या नवीन जलवाहिन्या टाकणार असून, पंपिंग स्टेशन उभारणार आहे. नवीन जल वाहिन्यांचे जाळे विस्तारल्यानंतर हनुमानपाडा झोपडपट्टीतील एक हजार घरांतील चार हजार रहिवाशांचे पाण्याचे टेंशन मिटणार आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल २१ कोटी ७ लाख ८० हजार रुपये खर्चणार आहे.

मुलुंड पूर्व हनुमानपाडा झोपडपट्टीत बहुतांश घरात नळजोडणी आहे; मात्र या झोपडपट्टीत कमी दाबाने पाणी होत असल्याच्या तक्रारी पालिकेच्या टी वॉर्ड व जलविभागाला प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत या भागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नवीन जल वाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, आता हनुमानपाडा येथील झोपडपट्टीत नवीन जल वाहिन्या टाकणे, पंपिंग स्टेशन उभारणे, उदंचंद व्यवस्था केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी २१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे हनुमानपाडा झोपडपट्टीतील एक हजार झोपडपट्टीतील चार हजार रहिवाशांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, असा विश्वास पालिकेच्या जल विभागाकडून व्यक्त करण्यात आला.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटीशकालीन असून, त्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे नवीन जलवाहिन्यांचे जाळे विस्तारले जात असून, नवीन जलवाहिन्या टाकल्याने मुंबईतील पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल आणि मुंबईकरांना धो-धो पाणी उपलब्ध होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागाकडून व्यक्त करण्यात आला.

दूषित पाण्याचा प्रश्न सुटणार!

हनुमानपाडा झोपडपट्टीत पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु कमी दाबाने आणि दूषित पाणी पुरवठा होतो, अशा तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे नवीन जल वाहिन्या टाकण्यात येणार असून, यामुळे मुबलक पाणीपुरवठा होईल आणि दूषित पाण्याचा प्रश्न निकाली निघेल, असे ही जल विभागाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in