
मुंबई - टास्कच्या नावाने एका कॉल सेंटरमध्ये काम करणार्या व्यक्तीची सुमारे नऊ लाखांची ऑनलाईन फसवणुक करणार्या कटातील मुख्य ठगाला कुरार पोलिसांनी अटक केली. हिमांशू लक्ष्मणसिंग जैन असे या ठगाचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांत त्याचे इतर काही सहकार्यांची नावे समोर आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ४२ वर्षांचे तक्रारदार त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड येथे राहतात. ते एका कॉलसेंटरमध्ये कामाला आहे. एप्रिल महिन्यांत त्यांना त्यांच्या सोशल मिडीयावर एका अज्ञात व्यक्तीने मॅसेज पाठविला होता. त्यात टास्क पूर्ण केल्यावर पैसे मिळतील असे नमूद केले होते. त्यामुळे त्यांनी ती लिंक ओपन केली असता त्यात इरॉस इंटरनॅशनल कंपनीची एक वेबसाईट ओपन झाली होती. त्यांनी तिथे लॉगिंन केल्यानंतर त्यांना एकूण २८ टास्क देण्यात आले होते. ते टास्क पूर्ण केल्यानंतर त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल असे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी दिलेले सर्व टास्क पूर्ण केले होते. या टास्कवर त्यांना चांगले कमिशन मिळाले होते. त्यामुळे त्यांना त्यांच्यावर विश्वास बसला होता. ७ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत त्यांनी विविध टास्कसाठी सुमारे नऊ लाखांची गुंतवणुक केली होती. मात्र त्यांना गुंतवणुकीसह कमिशनची रक्कम मिळाली नव्हती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी कुरार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी १६ एप्रिल २०२३ रोजी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. गेल्या चार महिन्यांपासून या ठगाचा पोलिसांकडून शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन गुरुवारी हिमांशू जैन याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ऑनलाईन फसवणुक करणारी ही एक टोळी असून या टोळीचे इतर सदस्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.