लोककलावंतावर मानधनाअभावी उपासमारीची वेळ; आम्ही कलावंत झालो हा आमचा गुन्हा आहे का? लोककलावंतांचा सवाल

जगभरात भारतीय संस्कृतीचे अनुकरण होत असताना महाराष्ट्रातील पारंपारिक संस्कृती जपणाऱ्या लोककलावंतावर मानधनाअभावी उपासमारीची वेळ आली आहे.
लोककलावंतावर मानधनाअभावी उपासमारीची वेळ; आम्ही कलावंत झालो हा आमचा गुन्हा आहे का? लोककलावंतांचा सवाल

रमेश औताडे/मुंबई

जगभरात भारतीय संस्कृतीचे अनुकरण होत असताना महाराष्ट्रातील पारंपारिक संस्कृती जपणाऱ्या लोककलावंतावर मानधनाअभावी उपासमारीची वेळ आली आहे. उड्डाणपुलावर १२ कोटींची रोषणाई, वर्षभर पालिका शाळेतील विद्यार्थी गणवेशाविना, उभा आडवा सिमेंट काँक्रिटचा गगनचुंबी विकास, ठाणे जिल्ह्यात कुपोषण, मेट्रोसाठी करोडोचे कर्ज असे राज्यभर चित्र असताना 'अच्छे दिन' नक्की कोणाचे आले आहेत? असा सवाल राज्यातील लोककलावंत करत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्याच ठाणे जिल्ह्यातील लोककलावंत ऑगस्ट २०२२पासून मानधन योजनेच्या प्रतिक्षेत आहेत. २०२४ उजाडले आहे. कलावंतांची परिस्थिती काय होती आणि आता काय झाली याची कल्पना मुख्यमंत्र्यांना असूनही ते लक्ष देत नाहीत. आम्ही कलावंत झालो हा आमचा गुन्हा आहे का? सांस्कृतिक मंत्री व मुख्यमंत्री यांच्या आत्तापर्यंत या कलावंतांनी फक्त आणि फक्त घोषणा ऐकल्या आहेत. अंमलबजावणी होताना दिसत नाही? घोषणा आणि प्रतिक्षा यापलीकडे कलावंताना काहीही मिळाले नाही. स्टार हिरो करोडो रुपयांचे सरकारी कोट्यातून घर मिळवत आहेत; मात्र आम्ही अजून गावकुसाबाहेर आहे. गरीब श्रीमंत हा भाव कलेमध्ये सरकारने आणला आहे, असा आरोप लोककलावंत संघटनेचे जेष्ठ अभ्यासक सुभाष जाधव यांनी केला आहे.

सरकारने आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावावा. मानधन वाढ, आरोग्य विमा, पेन्शन या व इतर मागण्यांचे निवेदन देऊन आता आम्हाला कंटाळा आला आहे. आंदोलन करून जीव त्रासला आहे.

मुंबई सारख्या मेट्रो शहरात पूर्वी लोककलावंत होते हे भविष्यात पुस्तकात वाचावयास मिळेल, अशी स्थिती आहे. लोककलावंत संघटनेचे जेष्ठ अभ्यासक सुभाष जाधव यांनी या विषयावर सरकारला अनेक वेळा या कलावंतांच्या समस्या बाबत निवेदन दिले आहे. मुंबई उपनगरात हिवाळ्याततमाशा फड असायचे, आता गौतमी संस्कृती आली आहे. कामावरून घरी जाताना टाळ मृदंग वाजवत उपनगरीय रेल्वेमध्ये कामगार कष्टकरी मराठी माणूस भजन म्हणत होता. त्यावर बंदी आली होती. त्यासाठी या भजनी मंडळी वारकऱ्यांना आंदोलन करावे लागले. अशा स्थितीमुळे मुंबईत मराठी लोककलावंत व मराठी सामान्य माणूस परका झाला आहे.

विविध वाद्य वाजवणारे कलाकार आज बेरोजगार

आज पुन्हा ऑर्केस्ट्रा बारची छमछम सुरू झाली आहे. ऑर्केस्ट्रा बारचा मनोरंजन परवाना नूतनीकरण करताना कलावंत असेल,तर तो नूतनीकरण होतो; मात्र आज सर्वच ऑर्केस्ट्रा बार मध्ये ब्लूठुथ लाऊन लीप साँग पद्धतीने मनोरंजन सुरू आहे. पूर्वी जे ढोलक, बासरी, ड्रम, आदी वाद्य वाजवत गाणी गायली जायची ते आता होत नाही. त्यामुळे ही वाद्य वाजवणारे कलाकार आज बेरोजगार असताना ऑर्केस्ट्रा बार मालकाला सरकार परवाना नूतनीकरण कसे काय करून देते? असा सवाल महाराष्ट्र राज्य ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशनने सरकारला केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in