तरुण पिढीसाठी पुस्तकांचा खजिना

मुलुंड पूर्व येथील डॉ. चिंतामणराव देशमुख उद्यान ५० वर्षे जुने असून २० हजार चौरस मीटरवर उद्यान पसरले आहे
तरुण पिढीसाठी पुस्तकांचा खजिना

डिजिटल युगात मोबाईल, लॅपटॉपच्या दुनियेत पुस्तक वाचनाची सवय कायम रहावी यासाठी पालिकेच्या उद्यानात मोफत वाचनालयची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. मुलुंड येथील डॉ. चिंतामणराव देशमुख उद्यानात खास करुन तरुण पिढीसाठी मोफत वाचनालय सुविधा उपलब्ध केली असून विविध पुस्तकांचा खजिना वाचक रसिकांसाठी पर्वणीच ठरणार आहे, असा विश्वास मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी व्यक्त केला.

मुलुंड पूर्व येथील डॉ. चिंतामणराव देशमुख उद्यान ५० वर्षे जुने असून २० हजार चौरस मीटरवर उद्यान पसरले आहे. या उद्यानात रोज २ ते ३ हजार पर्यटक भेट देतात. उद्यानात येणाऱ्या लहान मुलांसह मोठ्या व्यक्ती जेष्ठ नागरिकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या उद्यानात प्रोजेक्ट मुंबई या संस्थेच्या माध्यमातून बिझनेस संबंधित, योगा व लहान मुलांसाठी अशा विविध गटातील प्रत्येकासाठी वाचनीय पुस्तकांचा खजिना उपलब्ध केला आहे. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या हस्ते या मोफत वाचनालयाचे उद्घाटन झाले. आतापर्यंत मुंबईतील २२ उद्यानात मोफत वाचनालयची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे परदेशी यांनी सांगितले. दरम्यान, डॉ. चिंतामणराव देशमुख यांचा भव्य पुतळा येथे येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.

जॉगिंग ट्रॅक, ओपन जिमचीसुद्धा सुविधा

डॉ. चिंतामणराव देशमुख उद्यानात येणाऱ्या पर्यटकांच्या मनोरंजनासाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यात जॉगिंग ट्रॅक, ओपन जीम, योगा केंद्र, स्केटिंग रिंग, कारंजे आदी सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in