जुन्या रेल्वे डब्यात ‘दादर दरबार’ खवय्यांसाठी अनोखा अनुभव

मध्य रेल्वेतर्फे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ या खानपान धोरणाच्या नाविन्यपूर्ण योजनेनुसार कालबाह्य रेल्वे डब्यांना रेस्टॉरंटमध्ये रूपांतरित करण्यात येत आहे. त्यानुसार दादर पूर्व येथे "दादर दरबार" हे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ उघडण्यात आले आहे. येथे खवय्यांना जेवणाचा अनोखा अनुभव घेता येणार आहे.
जुन्या रेल्वे डब्यात ‘दादर दरबार’ खवय्यांसाठी अनोखा अनुभव
Published on

मुंबई : मध्य रेल्वेतर्फे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ या खानपान धोरणाच्या नाविन्यपूर्ण योजनेनुसार कालबाह्य रेल्वे डब्यांना रेस्टॉरंटमध्ये रूपांतरित करण्यात येत आहे. त्यानुसार दादर पूर्व येथे "दादर दरबार" हे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ उघडण्यात आले आहे. येथे खवय्यांना जेवणाचा अनोखा अनुभव घेता येणार आहे.

भारतीय उपखंडातील पहिली ट्रेन धावण्याचा मान मध्य रेल्वेला मिळाला आहे. मध्य रेल्वे सध्या विविध मार्गाने महसूल मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. मध्य रेल्वेने ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ या खानपान धोरणाच्या नाविन्यपूर्ण कल्पनांच्या अंतर्गत जुन्या ‘कोडल लाइफ’ संपलेल्या रेल्वे डब्यांना रेस्टॉरंटमध्ये बदलण्याची संकल्पना अंमलात आणली आहे. रेल्वे-थीम असलेल्या सेटिंगमध्ये जेवणाचा अनोखा अनुभव मिळणार असल्याने ही योजना लोकप्रिय झाली आहे.

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावर ‘दादर दरबार’ हे ७२ जणांना सामावून घेण्याइतके ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ खुले करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेच्या उत्पन्नात वाढ

‘दादर दरबार’ हे मेसर्स युनिक एंटरप्रायझेसला ५ वर्षांच्या कालावधीसाठी वार्षिक ५८.११ लाख परवाना शुल्कासह ई-लिलावाद्वारे वाटप करण्यात आले आहे, तर स्वयंपाकघरासाठी दिलेल्या अतिरिक्त जागेतून मध्य रेल्वेला दरवर्षी १५.५९ लाख महसूल मिळणार आहे. सेवेतून काढून टाकलेला रेल्वे डबा परवानाधारकाने वास्तुविशारदाकडून डिझाइन केलेल्या रेस्टॉरंटमध्ये बदलला आहे. दरम्यान, ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ ही संकल्पना सध्या लोकमान्य टिळक टर्मिनस, पुणे, अमरावती आणि अकोला येथे अंमलात आणली गेली आहे.

logo
marathi.freepressjournal.in