खंडणीच्या गुन्ह्यांत तडीपार केलेल्या महिलेस अटक

धाक दाखवून खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता.
खंडणीच्या गुन्ह्यांत तडीपार केलेल्या महिलेस अटक

मुंबई : तडीपारची कारवाई सुरू असताना मालाड परिसरातील एका कापड व्यापाऱ्याच्या पत्नीला खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी एका महिलेस मालवणी पोलिसांनी अटक केली. जुबेदा कलाम रईस खान ऊर्फ जुबेदा कलाम शेख ऊर्फ झिब्बो असे या ४६ वर्षांच्या महिलेचे नाव असून ती रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तिच्यासह तिच्या पती सलीम खान या दोघांना पोलिसांनी तडीपार केले होते, तरीही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरू असल्याचे तपासात उघडकीस आले. या गुन्ह्यांत रेश्मा समीर शेख, जमिला इम्रान खान आणि जायदा आलम या तिघींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले. तक्रारदार महिला ही मालवणी परिसरात राहत असून तिचे पती कापड व्यापारी आहेत. याच परिसरात गुंड प्रवृत्तीची परिचित असलेल्या जुबेदाने तुझ्या पतीचा व्यवसाय चांगला चालत असून त्याला पैसे देण्यास सांग, नाहीतर पतीविरुद्ध लैंगिक अत्याचाराची खोटी केस करून त्याला कायमचे तुरुंगात पाठवेन, अशी धमकी देत होती. तिच्या सततच्या धमकीला कंटाळून अखेर तिने जुबेदासह इतर तीन महिलांविरुद्ध मालवणी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर २९ जानेवारीला या चौघींविरुद्ध पोलिसांनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. अखेर पळून गेलेल्या जुबेदाला शनिवारी मालवणी पोलिसांनी अटक केली.

logo
marathi.freepressjournal.in