मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. पहिल्याचं पावसात मुंबईची तुंबई झाली. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले. यावेळी मॅनहोलमध्ये सफाई करण्यासाठी उतरलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा गोवंडी येथे मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मॅनहोल स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या कर्मचाऱ्याच्या अंगावरुन कार गेल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ११ जून रोजी ही घटना घडली आहे. आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
जगवीर यादव असं या कर्मचाऱ्याच नाव आहे. तो कांदिवलीच्या डहाणूकरवाडी परिसरात ड्रेनेज लाईन साफ करण्यासाठी मॅनहोलमध्ये उतरला होता. यावेळी एक कार आली आणि जगवीरच्या अंगावरुन गेली. पोलिसांनी याप्रकरणी कारचालक आणि कंत्राटदाराला अटक केली आहे.
जगवीर हा ड्रेनेजची सफाई करण्यासाठी मॅनहोलमध्ये उतरला होता. तो सफाई करण्यासाठी खाली वाकला होता. एवढ्यात समोरून एक कार आली आणि त्याच्या अंगावरुन गेली. यामुळे जगवीर हा मॅनहोलमध्ये अडकला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला जखमी अवस्थेत बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात उपराचारसाठी दाखल केलं. मात्र, रविवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी कंत्राटदार आणि चालक यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.
मुंबईतील गोवंडीतील शिवाजीनगर भागात भागात मुंबई महानगरपालिकेकडून मॅनहोलमध्ये सफाई करण्यास उतरलेल्या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला झाल्याने खळबळ उडाली होती.