
मुंबई : भाडेकरू आणि एजंटकडून सुरू असलेल्या मानसिक छळाला कंटाळून अंधेरी येथे राल्फ मेरी रॉड्रिक्स या ४० वर्षांच्या व्यक्तीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी आरोपी भाडेकरूसह एजंट अशा सात जणांविरुद्ध सहार पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
कमील पीटर गोन्सालविस, इम्तियाज शेख, सुरेंद्र चौहान, निलेश अनिल निकाळजे, ॲॅलेक्स व्हॅलेंटाईन अँथनी डिसोझा, भीमसेन बाजीराव गोकुळे आणि ज्योती भीमसेन गोकुळे अशी या सात जणांची नावे आहेत. राल्फ रॉड्रिक्स हा सध्या अमेरिकेतील कार्निव्हल क्रूझ शिपिंग कंपनीत कामाला आहे. राल्फचा सोफिया हिच्यासोबत विवाह झाला होता. जुलै २०१९ रोजी त्यांचा रिक्षाने जात असताना अपघात झाला होता. त्यात त्याच्या हाताला दुखापत झाली होती. अपघातानंतर अमेरिकेत जाण्याची संधी हुकल्यानंतर राल्फ आणि सोफिया या पतीपत्नीने वादविवादानंतर विभक्त राहण्याचा निर्णय घेतला.
राल्फ हा एकटाच राहत असल्यामुळे त्याने आपल्या घरातील वरचा माळा भीमसेन गोकुळे याला भाड्याने दिला होता. त्यांच्यातील करारानुसार नोव्हेंबर २०२१ रोजी त्याने रूम खाली करणे अपेक्षित होते. मात्र त्याने रूमसह भाडे देण्यासही नकार दिली. भीमसेनची पत्नी ज्योती राल्फविरुद्ध पोलिसांत सतत तक्रार करत होती. या दोघांकडून सतत खोटे आरोप करण्यात येत असल्याने राल्फ गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. गेल्या काही दिवसांपासून संबंधित आरोपींकडून राल्फचे प्रचंड मानसिक शोषण सुरु होते. त्यातून आलेल्या नैराश्यातून राल्फने शनिवारी दुपारी चार वाजता राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही माहिती मिळताच सहार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली असून त्यात राल्फने संबंधित सातही आरोपींच्या मानसिक छळासह धमकीला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते. याप्रकरणी त्याचा चुलत भाऊ रिनाल्डो रॉड्रिक्स याच्या तक्रारीवरून सहार पोलिसांनी सातही आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असून चौकशीनंतर संबंधितांवर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.