गांजा दिला नाही म्हणून धक्काबुक्कीत पडून तरुणाचा मृत्यू

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून आरोपी तृतीयपंथी सुमित्रा कंदस्वामी देवेंद्र ऊर्फ चिन्नी याला अटक केली.
गांजा दिला नाही म्हणून धक्काबुक्कीत पडून तरुणाचा मृत्यू

मुंबई : गांजा दिला नाही म्हणून शिवीगाळ करून धक्काबुक्कीत जमिनीवर पडल्याने आतिक अहमद जलील अहमद अन्सारी या ३४ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून आरोपी तृतीयपंथी सुमित्रा कंदस्वामी देवेंद्र ऊर्फ चिन्नी याला अटक केली. वाहिद अहमद जलील अहमद अन्सारी हा गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात राहतो. त्याचा आतिक हा भाऊ असून, त्याला गेल्या पाच वर्षांपासून ताडी व गांजा पिण्याचे व्यसन लागले होते. सोमवारी रात्री आतिक हा त्याचा तृतीयपंथी मित्र सुमित्रासोबत शिवाजीनगर, जुवेरिया ब्युटीपार्लरजवळ ताडी पिण्यासाठी बसले होते. यावेळी आतिकला ताडीमुळे प्रचंड नशा झाली होती. त्यामुळे त्याने सुमित्राला त्याला घरी सोडण्यास सांगितले. यावेळी सुमित्राने त्याच्याकडे गांजाची मागणी केली होती. त्याने गांजा देण्यास नकार दिला म्हणून त्यांच्यात वाद झाला होता. त्यातून त्याने त्याला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली होती. त्यात तोल गेल्याने तो खाली पडला आणि बेशुद्ध झाला. त्याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in