दीपक गायकवाड / मोखाडा
मध्य वैतरणा प्रकल्पात फिरण्यासाठी आलेल्या नाशिक जिल्ह्यातील नाशिक रोड परिसरातील आनंद पोपट गीते यांचा मध्य वैतरणामध्ये पोहत असताना सेल्फी घेत असता, पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाला आहे. सदरची घटना रविवार, ३० जून रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान घडली आहे. खबर मिळताच मोखाडा पोलिसांनी तातडीने धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने शिकस्तीने प्रवाहातून प्रेत बाहेर काढण्यात यश मिळवले आहे.
शनिवार व रविवार या लागून आलेल्या सुट्ट्यांचा व पाण्यात भिजण्यासाठी आणि पोहोण्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी हौशी तरुण पर्यटकांचा जथ्था दरवर्षी मोठ्या प्रमाणावर मोखाडा तालुक्याकडे आकर्षित होतो. परंतु धोकादायक ठिकाणांचा अंदाज नसल्याने बऱ्याचशा पर्यटकांच्या जीवावर बेतले आहे.अशाच प्रकारे वर्षाफेरीचा आनंद घेण्यासाठी नाशिक रोड परिसरातून मध्य वैतरणा प्रकल्प येथे केशव किसन मरकड, सचिन अशोक (आडनाव माहित नाही), राहूल रविंद्र जाधव, राहुल गिते व आनंद पोपट गिते हे ५ तरुण आले होते. यातील राहूल गिते व आनंद गिते हे पाण्यात पोहताना सेल्फी काढण्यात व्यस्त होते; मात्र सेल्फी काढताना पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे प्रवाहाबरोबर वाहून जात असताना सोबतच्या तरुणांनी राहुल जाधव याला सुखरूप बाहेर काढले; मात्र आनंद गीते वाहून गेला यातच त्याचा मृत्यू झाला आहे.
आनंद गीते याचे शव कसारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावरखुट परिसरात वाहत जाऊन एका मोठ्या दगडाला अडकल्याने लगेच हाती लागले आहे. दगडाला अडकले नसते, तर शव मिळणे कठीण झाले असते, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे.