राज्यात महिला अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. गुन्हेगारांवर कायाद्याचा वचक राहिला नसल्याचं चित्र सर्वत्र निर्माण झालं आहे. पुण्यातील दर्शना पवार या तरुणीच्या हत्येने सर्व देश हळहळला. तसंच प्रेमाला नकार दिला म्हणून पुण्यातील सदाशिव पेठेत अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. यात ती तरुणीवर थोडक्यात बचावली. आता मुंबई लोकलमध्ये एका तरुणीची छेड काढत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात छेड काढणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालाड येथील रहिवासी असलेली तरुणी शुक्रवारी रात्री कामानिमित्त चर्नीरोड येथे लोकलने जात होती. गॅन्ट रोड स्थानक जवळ येताच एका तरुणाने या तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. हा तरुण अश्लिल चाळे, अश्लिल वक्तव्य करुन तरुणाला त्रास देत होता. तरुणीने आरडा ओरड केल्यानंतर लोकलचा वेग कमी झाल्यावर तरुण उडी मारुन पसार झाला. तरुणीच्या तक्रारीवरुन मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या आरोपीचा शोध सुरु आहे.
यानंतर तरुणीने आरपीएफकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आरपीएफ, जीआरपी, क्राईम ब्रान्च आणि मुंबई पोलिसांनी पथके तयार करुन आरोपींचा शोध सुरु केला आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज देखील तपासले जात आहे.
काही दिवसांपूर्वी हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकादरम्यान भीषण प्रकार घडला होता. परिक्षा देण्यासाठी जाणाऱ्या एका तरुणीवर आरोपीने लैंगिक अत्याचार केला होता. यावेळी तरुणीने आरडा ओरड केल्यानंतर आरोपीने मस्जिद बंदर स्थानकावरुन पळ काढला होता.