Mumbai: धक्कादायक! लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून

लोकलमध्ये बसण्याच्या वादातून घाटकोपर रेल्वे स्थानकात १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने टिटवाळ्याचे रहिवाशी अंकुश भालेराव (३३) यांना भोसकून ठार केले.
Mumbai: धक्कादायक! लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून
Published on

मुंबई : लोकलमध्ये बसण्याच्या वादातून घाटकोपर रेल्वे स्थानकात १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने अंकुश भालेराव (३३) यांना भोसकून ठार केले. ही घटना १५ नोव्हेंबर रोजी घडली. हा खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत मरण पावलेले अंकुश भालेराव टिटवाळा येथे राहतात. घाटकोपर येथील दारूच्या दुकानात ते व्यवस्थापक म्हणून काम करतात. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.५३ वाजता सीएसएमटी लोकल पकडली. लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरून एका अल्पवयीन मुलासोबत त्यांचा वाद झाला. यावेळी त्या अल्पवयीन मुलाने भालेराव यांना ठार मारण्याची धमकी दिली.

१५ नोव्हेंबरला भालेराव हे त्याच लोकलमध्ये बसले. सकाळी ९.५० वाजता ही लोकल घाटकोपरला फलाट क्रमांक ४ वर आली. भालेराव हे स्टेशनमधून बाहेर पडत असतानाच त्या अल्पवयीन मुलाने त्यांच्यावर छातीत व पोटात चाकूचे वार केले. मोठा रक्तस्त्राव झाल्याने भालेराव जागीच कोसळले. गर्दीचा फायदा घेऊन तो अल्पवयीन मुलगा पळून गेला. या चाकू हल्ल्यात भालेराव यांच्या यकृत व अन्य महत्त्वाच्या अवयवांना इजा झाली. प्रवाशांनी भालेराव यांना तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले. पण रात्रौ ७.१० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूपूर्वी पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला आहे.

सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली आहे. पोलीस चौकशीत या अल्पवयीन मुलाने खुनाची कबुली दिली आहे.

रेल्वे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर म्हणाले की, भालेराव यांच्यावर हल्ला करताना अल्पवयीनाने मास्क घातला होता. हल्ल्यानंतर तो फरार झाला. घाटकोपर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर त्याने मास्क काढून टाकला. आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा तो गोवंडीत असल्याचे दिसून आले. त्याने आपल्या मोठ्या भावाशी संपर्क साधला. मोठ्या भावाने शस्त्र लपवले. आम्ही या प्रकरणी मोठ्या भावाला अटक केली असून शस्त्र जप्त केले.

logo
marathi.freepressjournal.in