प्रपोजल नाकारल्याने सोशल मिडीयावर तरुणीची बदनामी

धडा शिकविण्यासाठी त्याने तिचे सोशल मिडीयावर बोगस अकाऊंट उघडले होते
प्रपोजल नाकारल्याने सोशल मिडीयावर तरुणीची बदनामी

मुंबई: बोगस अकाऊंटच्या माध्यमातून सोशल मिडीयावर एका तरुणीची बदनामी केल्याप्रकरणी प्रिंसकुमार भारती ऊर्फ राजकुमार गोस्वामी नावाच्या एका २८ वर्षांच्या आरोपीस आंधप्रदेशातून डी. बी मार्ग पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. प्रेमाचा प्रपोजल नाकारल्याने रागाच्या भरात त्याने या तरुणीचे बोगस प्रोफाईल तयार करून तिची बदनामी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. २१ वर्षांची तक्रारदार तरुणीची सोशल मिडीयावर प्रिंसकुमारशी ओळख झाली होती. त्यानंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. याच दरम्यान त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले होते. त्यानंतर ते दोघेही चॅटच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. गेल्या वर्षी तो तिला भेटण्यासाठी मुंबईत आला होता. यावेळी त्याने तिला प्रपोज केले होते; मात्र तिने त्याला नकार दिला होता. काही दिवसांनी तिने त्याच्याशी असलेले संबंध तोडून टाकले होते. त्याच्या त्याच्या मनात राग होता. त्यातून तिला धडा शिकविण्यासाठी त्याने तिचे सोशल मिडीयावर बोगस अकाऊंट उघडले होते.

या अकाऊंटवरून तिच्या परिचित लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. त्यानंतर तिचे मॉर्फ केलेले फोटो अपलोड करुन तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार नंतर निदर्शनास येताच तिने डी. बी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आंधप्रदेशातून प्रिंसकुमारला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. प्रेमाचा प्रपोजल नाकारल्याने त्याने तिची बदनामी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in