लग्नास नकार दिला म्हणून तरुणीची बदनामी

मोबाईलचा हॅक करून अश्‍लील फोटोद्वारे ब्लॅकमेल; तीन लाखांच्या खंडणीची मागणी
लग्नास नकार दिला म्हणून तरुणीची बदनामी

मुंबई : लग्नास नकार दिला म्हणून एका २० वर्षांच्या तरुणीची बदनामी करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार जोगेश्‍वरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी साहिल चंद्रीका सहानी याला नवी मुंबईतून मेघवाडी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. साहिलने तरुणीच्या मोबाईलचा ऍक्सेस प्राप्त करून तिचे अश्‍लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून तीन लाखांची खंडणीची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अटकेनंतर साहिलला लोकल कोर्टाने बुधवार ४ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार तरुणीची ऑगस्ट २०२३ मध्ये सोशल मिडीयावरून साहिलशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती; मात्र तिने त्याला नकार दिला होता. त्यामुळे त्याने तिच्या आईशी लग्नाविषयी बोलणी केली होती. तिनेही त्यास नकार दिला होता. त्यातून तो प्रचंड चिडला होता. गोड बोलून त्याने तिच्या मोबाईलचा अॅक्सेस प्राप्त करून तिचे काही अश्‍लील फोटो स्वत: कडे ठेवले होते. तिचे अश्‍लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला ब्लॅकमेल करू लागला. तिच्याकडे तीन लाखांची खंडणीची मागणी केली होती; मात्र तिने त्याच्या ब्लॅकमेलसह धमकीकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे त्याने तिचे अश्‍लील फोटो तिच्याच नातेवाईकांना पाठवून तिच्या बदनामीसह विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार निदर्शनास येताच तिने मेघवाडी पोलिसांना हा प्रकार सांगून साहिलविरुद्ध तक्रार केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in