मुंबई : मुलुंडजवळील नाहूर गावात पालिकेच्या जमिनीवर प्राणीसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. शॉपिंग सेंटर, कॉफी शॉप, पार्किंगची सुविधा तसेच गेंडा, सिंह, विविध प्रजातींचे पशुपक्षी असणार आहेत. याचा मास्टर प्लॅन एच. के. डिझायनर या सल्लागाराने सादर केला असून पालिकेच्या प्रशासकीय मंजुरीनंतर सेंट्रल झू प्राधिकरणाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येईल, अशी माहिती भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली. दरम्यान, सेंट्रल झू प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतर डिझाईन फायनल तयार करून निविदा मागवण्यात येईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, पुढील दोन-अडीच वर्षांत ५० कोटी रुपये खर्चून पूर्व उपनगरातील प्राणीसंग्रहालय पर्यटकांच्या सेवेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण आहे. राणी बागेतील प्राणीसंग्रहालयात देशविदेशातील पशुपक्षांचा किलबिलाट धमालमस्ती अनुभवण्यासाठी राणी बागेत दररोज १० ते १२ हजार पर्यटक भेट देतात. येथे क्रॉक ट्रेल तयार करण्यात आले असून मगर, सुसरची धमालमस्ती अनुभवा येते. या पक्षीसंग्रहालयाचा विस्तार राणीबागेतच केला जाणार आहे. राणीबागेला लागूनच असलेल्या मफतलाल मिलचा सुमारे १० एकरचा भूखंड पालिकेला मिळाला आहे. या जागेत आधुनिक पद्धतीचे पक्षीगृह उभारण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियादेखील पूर्ण करण्यात आली आहे. प्रशासकीय बाबींची पूर्तता झाल्यानंतर पक्षीगृहाच्या कामाला गती मिळणार आहे. जुन्या पक्षीगृहात अतिरिक्त असलेले पक्षी मफतलाल भूखंडावरील प्रस्तावित पक्षीगृहात पाठवले जाणार आहेत. या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात देश-विदेशातील पक्षी या पक्षीगृहात पाहायला मिळतील, असेही ते म्हणाले.
राणी बागेत आणखी एक पक्षीगृह बांधले जाणार असताना नाहूर गावातही पक्षीगृह उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. नाहूर गावात नगर भूमापन क्रमांक ७०६ आणि ७१२ हे सहा हजार चौरस मीटरचे पालिकेच्या मालकीचे भूखंड आहेत. त्यावर हे पक्षीगृह प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी सार्वजनिक सुविधांसह पक्षीगृहाचा आराखडा व सविस्तर प्रकल्प अहवाल प्रकल्प व्यवस्थापन एच. के. डिझायनर यांनी सादर केला आहे. आता पालिका आयुक्त तथा प्रशासक म्हणून डॉ. भूषण गगराणी यांच्याकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येईल. प्रशासकीय मंजुरीनंतर सेंट्रल झू प्राधिकरणाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
असे असेल नाहूर येथील प्राणीसंग्रहालय
विविध प्रजातींचे पशुपक्षी, सिंह, गेंडा, प्राण्यांसाठी सोयीसुविधा, पर्यटकांसाठी शॉपिग सेंटर, कॉफी शॉप, पार्किंगची सुविधा, बच्चे कंपनीसाठी खेळण्यासाठी सोयीसुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे.