
मुंबई : प्राथमिक वर्गांमध्ये हिंदी विषय तिसऱ्या भाषेच्या रूपात सक्तीने लागू करण्याचा निर्णय सरकारने विरोधकांचा व नागरी समाजाचा दबाव आल्याने मागे घेतला, असे शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी नमूद केले.
सत्तेपेक्षा दबाव जिंकला, असे आदित्य ठाकरे यांनी विधान भवनाच्या आवारात पत्रकारांना सांगितले.
आदित्य ठाकरे म्हणाले, सत्ता असूनही सरकारला लोक, विरोधक आणि हिंदी लादण्याच्या विरोधातील इतर घटकांच्या दबावाखाली आपले निर्णय मागे घ्यावे लागले हे वास्तव आहे. ते म्हणाले, जोपर्यंत सरकार लेखी स्वरूपात औपचारिक निर्णय घेत नाही, तोपर्यंत आम्ही आमचा दबाव कायम ठेवणार आहोत.
या सरकारवर आमचा विश्वास राहिलेला नाही. मराठी जनतेची एकजूट दिल्लीत दिसायला हवी, असेही ठाकरे यांनी सांगितले.
हिंदी सक्तीबाबत घेतलेला निर्णय मागे घेणे म्हणजे जनतेच्या भावना आणि सरकार यांच्यातील दुराव्याचे स्पष्ट उदाहरण आहे. स्वतःचेच निर्णय मागे घेणे हे प्रशासनाच्या अपयशाचेही द्योतक आहे.
जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते
सरकारच्या निर्णयामागील हेतूविषयी विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले, भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकजुटीला रोखण्यासाठी धडपड करत आहेत. पण मराठी अस्मिता तोडण्याचा त्यांचा प्रयत्न अपयशी ठरेल.