
पंजाबमध्ये एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर आता आम आदमी पार्टीने (आप) मुंबईकडे मोर्चा वळवला आहे. यंदाची निवडणूक स्वबळावर लढवणार असून दिल्ली, पंजाबप्रमाणे मुंबईकरांना मोफत २०० युनिट वीज व पाणी देण्याची घोषणा आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा प्रीती मेनन यांनी सोमवारी केली.
आम आदमी पक्षाने यंदा पंजाब निवडणुकीत निर्विवाद यश संपादन केल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. “मुंबई महापालिकेत २५ दशकांहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. अनेक वर्ष मुंबई महापालिकेत शिवसेना, भाजपमध्ये सत्तेवर होते. मात्र लोकांच्या मूलभूत समस्या त्यांना सोडवता आलेल्या नाहीत. सध्या राजकारणाशिवाय ते काहीही करीत नसल्याचे चित्र आहे. लोकांची कामे व्हायला हवीत, ती तशीच असून फक्त मतांसाठी राजकारण केले जाते आहे. सर्व पक्षांच्या राजकारणाला लोक कंट़ाळले आहेत. त्यांना आता नवा पर्याय हवा आहे. तो पर्याय आम आदमी पक्ष देणार,” असे प्रीती मेनन यांनी सांगितले.
आम आदमी पक्ष निवडणूक लढवतो ते जिंकण्यासाठीच. दिल्ली व त्यानंतर पंजाबमध्ये एकहाती सत्ता आली आहे. देशभरात आपचे १५६ आमदार व ८ खासदार आहेत. आता आम्ही मुंबईसह महाराष्ट्रात लक्ष वेधले असल्याचे त्या म्हणाल्या. मागील १० वर्षापासून आम्ही लोकांच्या नागरी सुविधांवर काम करतो आहोत. आतापर्यंत फक्त मुंबईत ४० हजार कार्यकर्ते तयार झाले आहेत. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी आमची तयारी झाली आहे. आम्ही कोणाशी युती करणार नाही. आमची युती जनतेशी असणार आहे. पालिका निवडणूक ताकदीने लढवणार आहोत, असेही त्या म्हणाल्या.