
मुंबई : आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही इंडिया आघाडीचे घटक पक्ष एकमेकांविरोधात लढल्यामुळेच भाजपला दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला, असा दावा शिवसेना (ठाकरे) गटाने सोमवारी केला.
शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या मुखपत्राच्या संपादकीयमध्ये, विरोधी पक्ष भाजपऐवजी एकमेकांविरोधात लढत राहणार असतील तर अशा आघाड्यांची गरजच काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
भाजपने नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ४८ जागांवर विजय मिळवला. तर आपला २२ जागा मिळाल्या. अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांसारख्या वरिष्ठ नेत्यांचा पराभव झाला. काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा राजधानीत एकही जागा मिळाली नाही. दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस एकमेकांना संपवण्यासाठी लढले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी गोष्टी अधिक सोप्या झाल्या. हे असेच सुरू राहणार असेल तर आघाडी करण्याची गरजच काय? मग एकमेकांविरोधात मनसोक्त लढा!, असा टोला संपादकीयमध्ये लगावण्यात आला आहे.
महाराष्ट्रातही (२०२४ विधानसभा निवडणुकीत) विरोधी पक्षांच्या अशाच फाटाफुटीमुळे भाजपला मोठा फायदा मिळाला होता, असे नमूद केले आहे. दिल्लीतील निकालांकडून धडा घेतला नाही तर मोदी-शहा यांच्या "हुकूमशाही राजवटीला" बळ मिळेल, असा इशारा संपादकीयमध्ये आहे.
...तर आघाडीची गरजच काय?
विरोधक असेच एकमेकांविरुद्ध लढत राहणार असतील तर आघाड्यांची गरजच काय? मग फक्त आपसात भांडत राहा, असा उपरोधात्मक टोला पक्षाच्या मुखपत्रातील संपादकीयमध्ये लगावण्यात आला आहे. जो दिल्लीच्या निवडणुकीतून धडा घेणार नाही तो हुकूमशाहीला बळ देणाऱ्यांमध्ये गणला जाईल. अशा लोकांनी मग गंगेत स्नान करण्याचीही गरज नाही, असा इशारा संपादकीयमध्ये देण्यात आला आहे.