मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने मुंबईतील ३६ मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबईतील पक्षश्रेष्ठींनी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात आमचे सहकारी आणि स्वयंसेवक कामाला लागले आहेत आणि तयारी जोरात सुरू आहे, अशी माहिती आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.
आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, लोकचळवळीतून उदयास आलेला पक्ष सध्या दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेवर आहे. आमचे गोवा आणि गुजरातमध्ये आमदार आहेत आणि संसदेत खासदारांची संख्या लक्षणीय आहे. अवघ्या १० वर्षात आम आदमी पक्षाने विकासाचे दिल्ली मॉडेल दाखवून दिले आहे, जिथे सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण, आरोग्य सेवा, पाणी आणि वीज मोफत दिली जाते आणि तीही प्रामाणिकपणे आणि कर्जाशिवाय. हे दिल्ली आणि पंजाब देऊ शकले ते आम आदमी पक्षाच्या स्वच्छ राजकारण आणि नवीन राजकीय संस्कृतीमुळे आहे, असे त्या म्हणाल्या.
सध्याच्या भाजप-शिंदे सेनेच्या नेतृत्वाखालील ‘खोके सरकार’कडे लोकहितासाठी शून्य राजकीय इच्छाशक्ती आहे आणि त्याऐवजी ते केवळ भ्रष्टाचारातच व्यस्त आहेत. कारण ते सत्तेत पुन्हा येणार नाहीत, याची खात्री त्यांना आहे. एकनाथ शिंदे सरकार हे राज्याच्या तिजोरीची एकत्रितपणे लूट करण्याशिवाय दुसरे काही करत नाही. भाजप-शिंदे सेनेने केवळ राज्यघटनेची फसवणूक केली नाही, तर सर्वच आघाड्यांवर आलेले अपयश ही महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक आहेत, असेही त्या म्हणाल्या.
आम आदमी पक्ष हा केवळ पर्याय नाही, तर तो उपाय आहे, हे राज्यातील जनता जाणून आहे. आम आदमी पार्टी सामाजिक परिवर्तनासाठी सर्वात सक्षम पक्ष म्हणून उदयास आला आहे. आम्ही महाराष्ट्राला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून सोडवू, असे आपचे कार्याध्यक्ष रुबेन मस्कारेन्हास म्हणाले.