‘आपली एसटी’ ॲपद्वारे बसचे लोकेशन समजणार; ॲपवर १२ हजारांहून अधिक बसेसचा लाइव्ह डेटा

प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटी बसचे लोकेशन अचुक समजावे यासाठी ‘आपली एसटी’ या नावाने नवीन ॲपचे दसऱ्याच्या मुहूर्तावरण लोकार्पण करण्यात आले.
‘आपली एसटी’ ॲपद्वारे बसचे लोकेशन समजणार; ॲपवर १२ हजारांहून अधिक बसेसचा लाइव्ह डेटा
Published on

मुंबई : प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटी बसचे लोकेशन अचुक समजावे यासाठी ‘आपली एसटी’ या नावाने नवीन ॲपचे दसऱ्याच्या मुहूर्तावरण लोकार्पण करण्यात आले. ॲपवर १२ हजारांपेक्षा जास्त बस व राज्यभरातील १ लाखांपेक्षा जास्त मार्गाचे मॅपिंग करून ॲप विकसित केले आहे. भविष्यात सर्व बसेस या ॲपच्या कार्यकक्षेत येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) प्रवाशांच्या सोयीसाठी काॅम्प्युटर ॲप नव्या रूपात सादर केले असून आता या ॲपला ‘आपली एसटी’ (Aapli ST) असे नाव दिले आहे. या ॲपमुळे सर्वसामान्य मराठी प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि पारदर्शक होईल यावर अधिक भर दिला जाणार आहे.

या ॲपमुळे प्रवासी आपल्या जवळच्या बसस्थानकाची माहिती मिळवू शकणार असून प्रवासी माहिती केंद्राद्वारे बस कुठून सुटणार (एसटीडी) आणि ती बस थांब्यावर केव्हा पोहोचणार (ईटीए) याची वस्तुस्थिती जन्य (रिअल-टाइम) माहिती मिळेल. त्यामुळे प्रवाशांना थांब्यावर थांबून वेळ घालवण्याची गरज नाही, तर ते थेट बस उपलब्धतेनुसार थांब्यावर पोहोचू शकतील.

ॲपमध्ये अँड्रॉइड आणि ॲपल वापरकर्त्यांसाठी अनेक उपयुक्त सुविधा (फीचर्स )उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यात प्रवाशांना आपल्या जवळच्या बस थांब्याचा शोध घेणे, दोन थांब्यांदरम्यान चालणाऱ्या बसच्या वेळापत्रकाची माहिती पाहणे, आरक्षण केलेल्या तिकीटातील बस क्रमांक अथवा सेवा क्रमांक टाकून बसची थेट मागोवा (लाइव्ह ट्रॅकिंग करणे) घेणे, यांचा समावेश आहे.

याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ॲपमध्ये आपत्कालीन क्रमांकांची यादी देखील देण्यात आली असून, एकाच क्लिकमध्ये कोणत्याही आपत्कालीन क्रमांकावर कॉल करता येणार आहे. सध्या या ॲपवर राज्यातील तब्बल १२ हजाराहून अधिक बसेसचे लाइव्ह डेटा उपलब्ध आहे. भविष्यात सर्व बसेस या ॲपच्या कार्यकक्षेत येतील. पुढे प्रवाशांच्या अभिप्रायाच्या आधारे ॲपमध्ये आणखी सुधारणा करण्यात येणार आहेत. एसटीच्या सध्या असलेल्या तिकीट बुकिंग ॲपमध्येही बसची थेट माहिती समाविष्ट केली जाणार आहे, ज्यामुळे आगाऊ तिकीट आरक्षण करणाऱ्यांनाही सुविधा मिळेल.

सध्या हे ॲप MSRTC commuter app या नावाने प्ले स्टोअर मधून प्रवाशांना डाऊनलोड करून घेता येईल. तथापि, आपली एसटी हे नाव लवकरच प्ले स्टोअर मध्ये दिसू लागेल.

प्रवाशांकडून मागविण्यात येणार सूचना

एसटीचा उद्देश प्रवाशांना अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि सुरक्षित सेवा देण्याचा असून, आपली एसटी ॲप या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे, मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. तसेच महामंडळाने याबाबत प्रवाशांकडून सूचना व अभिप्राय मागवुन त्यांच्या अपेक्षेनुसार ॲपमध्ये सतत सुधारणा कराव्यात अशी सूचना त्यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in