रस्त्यांवरील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर ;साडेपाच हजारांहून अधिक बेवारस वाहने जप्त

मुंबईच्या सौंदर्यात अडथळा ठरणारी बेवारस वाहने जप्त करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ इकबाल सिंग चहल यांनी दिले आहेत
रस्त्यांवरील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर
;साडेपाच हजारांहून अधिक बेवारस वाहने जप्त

मुंबई : स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी अडथळा ठरणारी बेवारस वाहने जप्तीची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत ५,५७२ बेवारस वाहने जप्त केली असून जप्त वाहनांच्या लिलाव प्रक्रियेतून पालिकेच्या तिजोरीत ४ कोटी ७० लाख ८१ हजार ९७९ रुपयांचा महसूल जमा झाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

संपूर्ण स्वच्छ मुंबई अभियान राबवण्यात येत असून या अभियाना अंतर्गत मुंबईचे विद्रुपीकरण करणे, मुंबईच्या सौंदर्यात अडथळा ठरणारी बेवारस वाहने जप्त करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ इकबाल सिंग चहल यांनी दिले आहेत. स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी नव्याने नियमावली जारी केली असून नव्या नियमावलीनुसार बेवारस वाहने जप्त करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित सहायक आयुक्त व वॉर्डातील कार्यकारी अभियंता दिले आहेत. त्यामुळे बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर आहेत.

अरुंद रस्ते त्यात रस्त्यांच्या दुतर्फा पार्किंग यामुळे रस्त्यांवर वाहन चालकांना तारेवरची कसरत करत वाहन चालवावे लागते. त्यामुळे रस्त्यांच्या कडेला बेवारस सोडून दिलेली पर्यायाने वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने उचलून नेण्याची कार्यवाही पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार प्रशासनाने धडाक्यात सुरु केली आहे. बेवारस वाहनांच्या पालिका प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत आहेत. या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याने, त्या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यानंतर वाहतूक पोलिसांशी समन्वय साधत ही कार्यवाही सुरु केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कायदेशीर प्रक्रियेनंतर लिलाव

विहित मुदतीत मध्ये प्रतिसाद न मिळाल्यास जप्त केलेल्या बेवारस वाहनांचा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लिलाव केला जातो.

अशी झाली कारवाई

बेवारस वाहन जप्त केली - ५५७२

दुचाकी, तीन चाकी व चार चाकी बेवारस जप्त

लिलाव प्रक्रियेतून ४,७०,८१,९७९ रुपये महसूल जमा

जप्त वाहने संबंधित विभाग कार्यालयांच्या डम्पिंग यार्ड येथे ठेवण्यात येतात

logo
marathi.freepressjournal.in