
मुंबई : आर्थिक वादातून अंगाडियाच्या मॅनेजरचा अपहरणाचा प्रयत्न करून भुलेश्वर येथील कार्यालयात प्रवेश करून सुमारे ८५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि कॅश असा मुद्देमाल घेऊन पळून गेलेल्या एका आरोपीला भोपाळ येथून गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. गौरव नवीनकुमार जैन असे या ४० वर्षीय आरोपीचे नाव असून तो मध्य प्रदेशच्या भोपाळ, पार्वतीनगरचा रहिवाशी आहे. त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस येताच त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. सध्या तो पोलीस कोठडी असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.