अल्पवयीन मुलीचे शिवडीतून अपहरण; दिल्लीतून सुटका

बिहारचा रहिवाशी असल्याचे एपीआय स्नेहलसिंह खुळे यांनी सांगितले असून तरुणाला अटक
अल्पवयीन मुलीचे शिवडीतून अपहरण; दिल्लीतून सुटका
Published on

मुंबई : गेल्या आठवड्यात शिवडी येथून अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलीची शिवडी पोलिसांनी दिल्लीतून सुखरुप सुटका केली. या मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी मोहम्मद इर्शाद मुमताज खान या २३ वर्षांच्या बिहारी तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जाणार असल्याचे एपीआय स्नेहलसिंह खुळे यांनी सांगितले.

शिवडी परिसरात राहणारी पिडीत मुलगी २५ जुलैला घरातून निघून गेली आणि परत आली नाही. तिचा तिच्या पालकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे तिच्या पालकांनी शिवडी पोलिसांत तक्रार केली होती. या मुलीच्या मोबाईलवरुन पोलिसांनी तिचा शोध सुरू केला होता. यावेळी ती मोहम्मद इर्शादच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले. त्याचे कॉल डिटेल्स काढल्यानंतर तो दिल्लीत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांचे पथक दिल्लीला पोहोचल्यानंतर या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने दिल्लीतील गोकलपुरी व दयालपूर येथील एका बॅग कारखान्यातून मोहम्मद इर्शादला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने या मुलीचे अपहरण केल्याची कबुली दिली. त्यानंतर या मुलीची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. अपहरणाच्या गुन्ह्यांत आरोपीला अटक केली असून तो मूळचा बिहारचा रहिवाशी असल्याचे एपीआय स्नेहलसिंह खुळे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in