शताब्दी रुग्णालयातून वीस दिवसांच्या बाळाचे अपहरण; अटकेच्या भीतीने बाळाला केले पोलिसांच्या स्वाधीन

एपीआय हेमंत गिते यांनी सांगितले की, मूल होत नसल्याने तिने या मुलाचे अपहरण केल्याचे तपासात उघडकीस आले आहे
शताब्दी रुग्णालयातून वीस दिवसांच्या बाळाचे अपहरण; अटकेच्या भीतीने बाळाला केले पोलिसांच्या स्वाधीन

मुंबई : कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयातून वीस दिवसांच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या एका महिलेस पोलिसांनी काही तासांत अटक केली. या महिलेने बाळाचे अपहरण केल्यानंतर अटकेच्या भीतीने बाळाला वनराई पोलिसांच्या स्वाधीन करुन ते बाळ तिला रस्त्यावर मिळाल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तिला अपहरणाच्या गुन्ह्यांत अटक करुन बाळाला आईच्या स्वाधीन केले.

एपीआय हेमंत गिते यांनी सांगितले की, मूल होत नसल्याने तिने या मुलाचे अपहरण केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. रिंकी अनिल जैस्वाल ही महिला विरार येथे राहत असून वीस दिवसांपूर्वीच तिने एका मुलाला जन्म दिला होता. बुधवारी १० जानेवारीला ती तिच्या बाळाला घेऊन कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात आली होती. यावेळी तिच्या बाळाचे एका अज्ञात महिलेने अपहरण केले होते. तिने कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. त्यानंतर एपीआय हेमंत गिते, उपनिरीक्षक दीपक पाटील, नितीन पाटील यांच्यासह तीन पथकाने या महिलेचा शोध सुरु केला होता. ही महिला बाळाला एका लाल रंगाच्या कपड्यामधून रुग्णालयाच्या बाहेर पडत असल्याचे सीसीटीव्हीत दिसले. एक महिला वनराई पोलीस ठाण्यात एका बाळाला घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर एपीआय हेमंत गितेसह इतर पोलीस पथक तिथे गेले. यावेळी तिने ते बाळ तिला गोरेगाव येथील कामा इस्टेटजवळील रस्त्यावर सापडल्याचे सांगितले. मात्र, ती खोटे बोलत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तिची कसून चौकशी केली. आपल्या लग्नाला दीड वर्ष झाले होते. पण, मूल होत नव्हते. त्यामुळे तिनेच या बाळाचे अपहरण केल्याची कबुली दिली. अपहरणानंतर तिला तिच्या अटकेची भीती वाटली होती. तिच्यावर कारवाई होईल, या भीतीने ती पोलीस ठाण्यात आली आणि तिने खोटी माहिती सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आरोपी महिलेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर तिला पोलिसांनी अटक केली.

logo
marathi.freepressjournal.in