

मुंबई : शहर व उपनगरातील म्हाडा मुंबई मंडळाच्या अभिन्यासातील अनेक इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळालेले नाही. भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी म्हाडातर्फे गृहनिर्माण संस्थांकरिता विशेष अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. या अभय योजनेचा सुमारे ८० गृहनिर्माण संस्थांना लाभ मिळणार आहे. ही योजना १० एप्रिलपर्यंत या मर्यादित कालावधीपर्यंत लागू राहणार आहे.
म्हाडा प्राधिकरणाच्या सन २००७ मधील ठरावानुसार २९ जुलै २००४ ते ४ जून २००७ या कालावधीमध्ये देकारपत्र/ना-हरकत प्रमाण पत्र देण्यात आलेल्या गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकास प्रकल्पात अधिमूल्य फरकाची रक्कम वसूल करून घ्यावयाची आहे. त्यानुसार संबंधित गृहनिर्माण संस्थांना वसुलीपत्र देण्यात आले होते. पण बऱ्याच संस्थांनी अधिमूल्य फरकाच्या रकमेचा भरणा न केल्यामुळे म्हाडाकडून त्यांना त्यांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले नाही. परिणामतः संस्थेतील सभासदांना जल आकार, मालमत्ता कर इत्यादींचा वाढीव दराने भरणा करावा लागत आहे. ज्या विकासकांनी पुनर्विकासाचे काम भौतिकदृष्ट्या पूर्ण करून इमारत गृहनिर्माण संस्थेकडे हस्तांतरित केल्या आहेत. त्यामुळे अधिमूल्य फरकाच्या रकमेचा भार संस्थेवर व परिणामतः संस्थेतील सभासदांना सोसावा लागत आहे. या सर्व अडचणी समोर ठेवत या गृहनिर्माण संस्थांना अधिमूल्य फरकाच्या रकमेवरील व्याज माफ करण्यात आले आहे. त्यांना केवळ मूळ अधिमूल्य फरकाच्या रकमेचा भरणा करावा लागणार आहे.
अभय योजनांचा तपशील
म्हाडाच्या https://mhada. gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मुंबई शहर व उपनगरातील म्हाडा अभिन्यासातील भोगवटा प्रमाणपत्र प्रलंबित असलेल्या सर्व संस्थांना आवाहन करण्यात येते की, अभय योजनांचा लाभ घेऊन आपल्या संस्थेच्या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले आहे.